महाराष्ट्रातील राज्यसभेच्या जागेसाठी आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे. भारतीय जनता पार्टीकडून उमेदवार संजय उपाध्याय यांनी आपला निवडणूक अर्ज दाखल केला आहे. तर काँग्रेसकडून रजनी पाटील यांनी आपला अर्ज दाखल केला आहे. आज हा अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख होती.
काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांच्या निधनामुळे राज्यसभेची जागा रिक्त झाली आहे. काही दिवसांपूर्वीच निवडणूक आयोगाने या जागेसाठी निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले. त्यानुसार राजकीय पक्ष या निवडणुकीसाठी तयारीला लागलेले दिसत आहेत. भाजपाने या निवडणुकीसाठी मुंबईचे महामंत्री संजय उपाध्याय यांना रिंगणात उतरवले आहे. बुधवार, २२ सप्टेंबर रोजी त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे उपस्थित होते.
हे ही वाचा:
सावित्रीच्या लेकीचं गाऱ्हाणं मातोश्री ऐकणार का?
६७ टक्के पालक म्हणताहेत मुलांना शाळेत पाठवू
धूळ खात पडला आहे, अग्निशमन दलाचा ‘पांढरा हत्ती’
तर या निवडणूकीसाठी काँग्रेसने जम्मूच्या प्रभारी आलेल्या ज्येष्ठ नेत्या रजनी पाटील यांना उमेदवार म्हणून घोषित केलं आहे. त्यांनी आजच आपला अर्ज दाखल केला आहे. यावेळी महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेते मंत्री देखील उपस्थित होते. या शक्ती प्रदर्शनावरून एकूणच ही निवडणूक रंगतदार होणार असल्याचे दिसत आहे.
दरम्यान या निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने विधानसभेतील भाजपच्या १२ निलंबित आमदारांनाही मतदान करण्याची संधी देण्याचे आदेश दिले आहेत. त्यासाठी विधानसभेच्या बाहेर विशेष मतदान कक्ष उभारण्यात येणार आहे.