‘बंद आणि विरोध यांचा “धंदा”, गोळा होतो त्यावरच “चंदा”!’

‘बंद आणि विरोध यांचा “धंदा”, गोळा होतो त्यावरच “चंदा”!’

लखीमपूर खेरी येथील घडलेल्या प्रकरणाच्या निषेधार्थ महाविकास आघाडी सरकारने आज (११ ऑक्टोबर) महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. याच महाराष्ट्र बंदवरून भाजप नेते आशिष शेलार यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीकेची तोफ डागली आहे. तिघाडीतील तीन पक्षांची ‘महिषासुरी’ चाल असल्याचे आशिष शेलार यांनी ट्विटरवर ट्विट करत म्हटले आहे.

सत्तेत आल्यावर मेट्रो कारशेडचे काम बंद करून मुंबईकरांना वेठीस धरले आहे. कोस्टल रोड, नवी मुंबई, चिपी विमानतळ, समृद्धी महामार्गाला विरोध, मेट्रोचेही विरोधकच… हे तर विकासातील गतिरोधक, अशा शब्दात आशिष शेलार यांनी महाविकास आघाडीवर टीका केली आहे. ‘बंद आणि विरोध यांचा “धंदा”, गोळा होतो त्यावरच “चंदा”!’, असेही आशिष शेलार यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

आई जगदंबेच्या नवरात्रीत महाराष्ट्र बंद, ही तर तिघाडीतील तीन पक्षांची “महिषासुरी” चाल, आई दुर्गामाते जनतेला दे “बळ”! उधळून टाकील जनता या महिषासुरांचा हा “खेळ”!, अशा शब्दात आशिष शेलार यांनी महाविकास आघाडीवर टीकास्त्र सोडले आहे.

लखीमपूर खेरी येथील घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीचे घटकपक्ष म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना अशा तिन्ही पक्षांनी सोमवारी बंदची हाक दिली आहे. या बंदमध्ये अत्यावश्यक सेवा, रुग्णालये, औषधालये वगळता सर्व आस्थापना बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ९ ऑक्टोबरला तिन्ही पक्षांच्या प्रतिनिधींनी पत्रकार परिषद घेत बंदला पाठिंबा असल्याचे जाहीर केले होते.

Exit mobile version