२०२२ ला होऊ घातलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजतील लागले आहेत. नजरेच्या टप्प्यात आलेल्या या निवडणुकांसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. केंद्रातील सत्ताधारी भारतीय जनता पार्टीने या पाच राज्यांच्या निवडणुकांसाठी आपले निवडणूक प्रभारी जाहीर केले आहेत. यामध्ये महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना गोवा विधानसभेसाठी प्रभारी म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.
बुधवार, ८ सप्टेंबर रोजी सकाळी भाजपाने पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांसाठी प्रभारी आणि सह प्रभारी यांची घोषणा केली आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांनी या नियुक्त्या केल्या आहेत. भाजपाच्या अधिकृत ट्विटर खात्यावरून ही घोषणा करण्यात आली आहे.
गोव्यामध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी देवेंद्र फडणवीस यांना प्रभारी म्हणून नेमण्यात आले आहे. तर त्यांच्यासोबतच केंद्रीय मंत्री जी.किसन रेड्डी आणि दर्शना जर्दोश यांना सह प्रभारी म्हणून नेमण्यात आले आहे. यापूर्वी फडणवीस यांना बिहार विधानसभा निवडणुकांसाठी प्रभारी म्हणून पाठवण्यात आले होते. बिहार येथील त्यांच्या कार्याला यश आल्याचेही दिसून आले होते. भाजपाने बिहारमध्ये चांगले यश मिळवत सत्ता स्थापन केली होती. त्यानंतर आता तोच करिष्मा गोव्यात करून दाखवण्यासाठी फडणवीस सज्ज आहेत.
फडणवीस यांनी या नव्या नियुक्तीसाठी केंद्रीय नेतृत्वाचे आभार मानले आहेत. तर आगामी गोवा विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टी उत्तम यश संपादन करून सरकार स्थापन करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
हे ही वाचा:
शिवसेनेला मराठी माणसाचा एवढा आकस का?
अफगाणिस्तानमध्ये शरिया कायदा लागू होणार
संयुक्त राष्ट्राने अतिरेकी घोषित केले, आता होणार तालिबानचे मंत्री
बेस्टच्या बदललेल्या मार्गिकांमुळे बेस्ट समितीत वादळ
तर मणिपूर साठी केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांची प्रभारी म्हणून तर केंद्रीय मंत्री प्रतिमा भौमिक आणि आसाम सरकारमधील मंत्री अशोक सिंघल यांची सह प्रभारी म्हणून नेमणूक केली आहे. पंजाबच्या प्रभारी पदाची जबाबदारी केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांच्यावर सोपवण्यात आली आहे. तर त्यांच्या साथीला केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी आणि मीनाक्षी लेखी हे सह प्रभारी असतील. सोबतच लोकसभा खासदार विनोद चावडा हे देखील सह प्रभारी म्हणून कार्यरत असणार आहेत.
उत्तराखंड विधानसभा निवडणुकांसाठी केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्यावर प्रभारी पदाची धुरा सोपवण्यात आली आहे. तर लोकसभा खासदार लॉकेट चॅटर्जी आणि राष्ट्रीय प्रवक्ता आर. पी. सिंह हे सह प्रभारी म्हणून काम बघतील.
साऱ्या देशाचे लक्ष लागून असलेल्या आणि सर्वात महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांसाठीही प्रभारी आणि सह प्रभारी यांच्या नियुक्त्या करण्यात आले आहेत. तर त्या सोबतच क्षेत्रीय प्रभारी या संघटनात्मक नियुक्त्या नियुक्तीही भाजपाने केल्या आहेत.
केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान हे उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी प्रभारी म्हणून काम करतील तर त्यांच्या सोबत एकूण सात सह प्रभारी असणार आहेत. ज्यामध्ये केंद्रीय मंत्री अनुराग सिंह ठाकुर, केंद्रीय मंत्री अर्जून राम मेघवाल, केंद्रीय मंत्री शोभा करंदलाजे, केंद्रीय मंत्री अन्नपूर्णा देवी, खासदार सरोज पांडेय, खासदार विवेक ठाकूर आणि हरियाणाचे माजी मंत्री कॅप्टन अभिमन्यू या सात जणांचा समावेश असणार आहे. तर या सोबतच उत्तर प्रदेश राज्यातील सहा क्षेत्रांसाठी संघटन प्रभारी यांची ही नियुक्ती भाजपाने केली आहे.