ऑक्टोबर महिन्यात नांदेड जिल्ह्यातील देगलूर बिलोली विधानसभा मतदार संघाची पोटनिवडणूक होऊ घातली आहे. या पोटनिवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीने आपला उमेदवार घोषित केला आहे. शिवसेनेचे नाराज नेते आणि देगलूरचे माजी आमदार सुभाष साबणे हे या निवडणुकीसाठी भाजपाचे उमेदवार असणार आहेत. रविवार ३, ऑक्टोबर रोजी या संदर्भातील अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे विधानसभेतील भाजपाचे संख्याबळ आणखीन एकने वाढणार का? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे उमेदवार रावसाहेब अंतापूरकर हे देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते. पण कोरुना संसर्गामुळे त्यांचे निधन झाले. म्हणूनच देगलूरची जागा रिक्त झाली. या रिक्त जागेसाठी निवडणूक आयोगाने पोटनिवडणूक जाहीर केली आहे. सुभाष साबणे हे देगलूरचे आमदार राहिले असून २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत ते शिवसेनेचे अधिकृत उमेदवार होते. त्यांना क्रमांक दोनची मते पडली होती.
हे ही वाचा:
न भेटणाऱ्या मुख्यमंत्र्यांसाठी संतप्त शेतकऱ्यांची विशेष भेट
उलट्या मार्गाने जाणाऱ्या १३० दुचाकीस्वारांना पोलिस रोज करताहेत सरळ
शाहरुखपुत्र आर्यन खान क्रूझवर होता हे ‘कन्फर्म’; आठ जणांना घेतले ताब्यात
लोखंडवाला, मुर्गन चाळ हे अमलीपदार्थ तस्करांचे अड्डे!
काही दिवसांपूर्वीच सुभाष साबणे यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. तेव्हापासूनच साबणे यांच्या भाजपा प्रवेशाच्या चर्चा रंगू लागल्या होत्या. साबणे हे शिवसेनेत नाराज असल्याची चर्चा आधीपासून होताना दिसली आहे. अशातच आता साबणे यांना भाजपतर्फे उमेदवारी देण्यात आली आहे.
पंढरपूर पोट निवडणुकीप्रमाणे इथेदेखील महाविकास आघाडीला धूळ चारून विजयाची पुनरावृत्ती करण्याचा विश्वास भाजपातर्फे व्यक्त केला जात आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडून कोणाला उमेदवारी दिली जाणार? याकडे लक्ष लागले आहे. साबणे यांना भाजपाने दिलेली उमेदवारी शिवसेनेला चांगलीच जिव्हारी लागणार असल्याचेही म्हटले जात आहे.