कसबा, चिंचवडसाठी भाजपाचे शक्तीप्रदर्शन; रासने, अश्विनी जगतापांनी भरले अर्ज

महाविकास आघाडीचे उमेदवारही जाहीर

कसबा, चिंचवडसाठी भाजपाचे शक्तीप्रदर्शन; रासने, अश्विनी जगतापांनी भरले अर्ज

महाराष्ट्रातील चिंचवड आणि कसबा पेठ विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी भाजपने आपले उमेदवार जाहीर केले आहेत. मोठ्या शक्ती प्रदर्शनानंतर हेमंत रासने यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला आहे. कसबा पेठ पोटनिवडणुकीसाठी हेमंत रासने यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. रासने यांचा उमेदवारी अर्ज दाखल कुजण्याच्या आधी भारतीय जनता पक्षाच्या वतीने मोठ्या प्रमाणावर शक्तीप्रदर्शन केलं आहे. टिळकांच्या घरात उमेदवारी देतो. तुम्ही निवडणूक बिनविरोध करता का?, असं आव्हान भाजपचे वरिष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी यावेळी काँग्रेसचे नेते नाना पाटोळे यांना दिले.

चंद्रकांत पाटील म्हणाले की, महाविकास आघाडीला कसबा पोटनिवडणूक बिनविरोध करायची नाही आहे. त्यामुळे टिळकांचं नाव वापरत आहेत. माझं नाना पटोलेंना आव्हान आहे की, जर टिळक कुटुंबात उमेदवारी दिली तर बिनविरोध करणार का?, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. भाजपने मुक्ता टिळक यांच्या कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी नाकारली. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या शिष्टाईला अर्थ उरलेला नाही, अशी टीका नाना पटोलेंनी केली होती. त्यावर चंद्रकांत पाटलांनी आव्हान दिलं आहे. ते पुढे म्हणाले, महाविकास आघाडीचंच एकमत होत नाही आहे. चिंचवड मतदार संघात उमेदवारी लक्ष्मण जगतापांच्या कुटुंबात दिली आहे त्यामुळे चिंचवडमध्ये बिनविरोध निवडणूक होणार असं घोषित करुन टाका, असंही ते म्हणाले.

दिवंगत आमदार मुक्ता टिळकांच्या कुटुंबीयांमध्ये उमेदवारी न दिल्याने पुण्यात पोस्टरबाजी करण्यात आली. टिळकांच्या कुटुंबीयांमध्ये उमेदवारी न दिल्यामुळे ब्राह्मण समाज नाराज झाल्याची चर्चा सुरु झाली होती. समज आणि वस्तुस्थिती हे दोन वेगळे शब्द आहेत. समज निर्माण करायला फ्लेक्स लागतात. वस्तुस्थिती निर्माण करण्यासाठी काम करावं लागतं. आम्ही काम केलं आहे आणि या कामाची ब्राह्मण समाजाला जाणीव आहे. भाजपने कोणावर कधीही अन्याय केला नाही असे स्पष्टीकरण चंद्रकांत पाटील यांनी दिलं.

हे ही वाचा:

अमेरिकेने फोडला चीनचा फुगा; चीनने व्यक्त केला संताप

श्रीराम आणि सीतामाईना मूर्त स्वरूप देणारे मराठमोळे हात

पुणेकर लवकरच घेणार डबलडेकर प्रवासाचा आनंद

आशियातला पहिला हेलिकॉप्टर कारखाना बनवण्याचा बहुमान भारताला

कसबा निवडणूक उमेदवारी अर्जाच्या प्रक्रियेसाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि भाजपचे वरिष्ठ नेते चंद्रकांत पाटील दाखल झाले. या दोन नेत्यांबरोबरच अनेक स्थानिक कार्यकर्त्यांसह कसबा गणपती मंदिर ते दगडूशेठ गणपती मंदिरापर्यंत मोठी पदयात्रा काढण्यात आली. रासने यांनी अर्ज दाखल करण्यापूर्वी जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आले.

चिंचवडमधून अश्विनी लक्ष्मण जगताप

भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीने आगामी महाराष्ट्र विधानसभा पोटनिवडणुकीसाठी चिंचवडमधून अश्विनी लक्ष्मण जगताप यांना उमेदवारी दिली आहे.अश्विनी जगताप या दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी आहेत. हेमंत नारायण हे पुणे महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष आहेत कसबा पेठ आणि चिंचवड या दोन्ही जागांसाठी उमेदवारांची मोठी यादी होती. भाजपकडून कोणाला उमेदवारी दिली जाणार याबाबत सर्वांनाच उत्सुकता होती.

माविआचे उमेदवारही जाहीर

कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार निश्चित झाले आहेत. चिंचवड मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपला उमेदवार उभा करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. कसबा मतदारसंघातून काँग्रेसचे रवींद्र धंगेकर, तर राष्ट्रवादीचे राहुल कलाटे यांना चिंचवड विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.

Exit mobile version