चार राज्यांना भाजपने दिले नवे प्रदेशाध्यक्ष

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी केली नव्या बदलांची घोषणा

चार राज्यांना भाजपने दिले नवे प्रदेशाध्यक्ष

भारतीय जनता पक्षाने पक्ष पातळीवर आज काही महत्त्वाची पावले उचलली आहेत. भाजपने बिहार, दिल्ली, राजस्थान आणि ओरिसामधील भाजपचे प्रदेशाध्यक्ष बदलले आहेत. नवीन बदलांनुसार सम्राट चौधरी यांना बिहार, सी. पी जोशी यांच्यावर राजस्थान, मनमोहन सामल यांच्यावर ओडिशा आणि वीरेंद्र सचदेवा यांच्यावर दिल्ली भाजप प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी या नव्या बदलांची गुरुवारी घोषणा केली आहे.

दिल्ली महापालिका निवडणुकीत भाजपच्या पराभवानंतर आदेश गुप्ता यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यांच्या जागी हंगामी अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांना पूर्णवेळ अध्यक्ष करण्यात आले आहे. बिहारच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्त झालेले सम्राट चौधरी सध्या विधान परिषदेचे सदस्य आहेत. ते सभागृहातील विरोधी पक्षनेतेही आहेत. २०१५ मध्ये भाजपमध्ये येण्यापूर्वी लालू यादव यांचा पक्ष राष्ट्रीय जनता दल, नितीश कुमार यांचा पक्ष जनता दल युनायटेड आणि जीतन राम मांझी यांचा पक्ष ‘हम’ या पक्षातही ते होते. बिहारच्या राजकारणात सम्राट चौधरी हे केंद्रीय गृहमंत्री नित्यानंद राय यांच्या जवळचे मानले जातात. ते स्वतः यादव जातीतील आहेत.

कोण आहेत सीपी जोशी ?

भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने राजस्थानमधील चित्तोडगडचे दोन वेळा खासदार राहिलेले सीपी जोशी यांची राज्याध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे.. प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती होण्यापूर्वी ते पक्षात उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होते. अशोक पर्नामी प्रदेशाध्यक्ष असताना त्यांनी युवा मोर्चाचे अध्यक्ष म्हणूनही काम पाहिले आहे. सीपी जोशी हे ब्राह्मण समाजाचे आहेत.अलीकडेच केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी राज्यात ब्राह्मण परिषद घेऊन राज्याच्या राजकारणात ब्राह्मणांना योग्य प्रतिनिधित्व आणि सन्मान देण्याबाबत भाष्य केले होते.

हे ही वाचा:

अमृतपाल सिंहचे काय झाले? न्यायालयालाही पडलाय प्रश्न…

आशियातील सर्वात मोठी दुर्बीण उत्तराखंडमध्ये

आज हुतात्मा दिन! याच दिवशी दिली होती भगत, सिंह, राजगुरू, सुखदेव या क्रांतीकारकांना फाशी

अमृतपाल सिंहचे काय झाले? न्यायालयालाही पडलाय प्रश्न…

वीरेंद्र सचदेवा यांना दिल्ली मिळाली

नुकत्याच पार पडलेल्या दिल्ली महापालिका निवडणुकीत भाजपला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. यामुळे १५ वर्षे सत्तेत राहून भाजपला महापालिकेच्या सत्तेतून बाहेर पडावे लागले होते. यानंतर प्रदेशाध्यक्ष आदेश गुप्ता यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर वीरेंद्र सचदेवा यांच्याकडे कार्याध्यक्ष म्हणून जबाबदारी आली. वीरेंद्र सचदेवा दीर्घकाळापासून पक्ष संघटनेत कार्यरत आहेत. त्यांनी मयूर विहार जिल्ह्याच्या अध्यक्षांसह पक्षाचे उपाध्यक्षपद भूषवले आहे. आता त्यांना पूर्णवेळ प्रदेशाध्यक्ष करण्यात आले आहे.

Exit mobile version