पुण्यातील कोरोना स्थिती दिवसेंदिवस बिकट होत आहे. त्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आज आढावा बैठक पार पडली. या बैठकीनंतर आयुक्त सौरभ राव यांनी पत्रकार परिषद घेत पुण्यातील मिनी लॉकडाऊनबद्दल माहिती दिली. पुण्यात पुढील सात दिवस अंशत: लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. पुण्यात संध्याकाळी सहा ते सकाळी सहा संचारबंदी लागू करण्यात आली आहे. शहर बस वाहतूक, धार्मिक स्थळं, हॉटेल सेवा पुढील सात दिवसांसाठी बंद राहणार आहे. मात्र, बस आणि हॉटेल्स बंद ठेवण्याच्या निर्णयाला भाजपानं तीव्र विरोध दर्शवला आहे.
भाजपाचे खासदार गिरीश बापट यांनी पत्रकार परिषद घेत भाजपाची भुमिका मांडली. पुण्यात जे नव्याने निर्बंध लावण्यात आले आहेत. त्यातील दोन-तीन गोष्टींना विरोध असल्याचं बापट यांनी सांगितलं. पोलिसांनी कायदा घातात घेऊ नये. विनाकारण बाहेर फिरणाऱ्या लोकांवर लाठीमार न करता थेट गुन्हे दाखल करा, अशी मागणी बापट यांनी केलीय. पीएमपीएमल बस बंद करण्यासही भाजपाने विरोध दर्शवलाय. बस बंद झाली तर कामगार वर्ग प्रवास कसा करणार? असा प्रश्न विचारतानाच ४० टक्के क्षमतेनं पीएमपीएमएल बस सुरु ठेवण्याची मागणी बापट यांनी केली आहे. हॉटेल्स पूर्ण क्षमतेनं बंद न करता उभे राहून खाण्यास परवानगी द्या अशी मागणी भाजपानं केली आहे. संचारबंदी नको तर जमावबंदी असावी अशी भूमिका भाजपाने मांडली आहे.
हे ही वाचा:
महाराष्ट्र पोलिसांमुळेच वाचले, ३० कोटी अन् बिल्डर जितू पटेल
वाझे प्रकरणात अबू आझमींचा खळबळजनक खुलासा
भाजपा सत्तेवर आल्यानंतर सीमेवरून माणूसच काय पक्षीही घुसू देणार नाही
पोलिसांनी दक्षता समिती, सामाजिक कार्यकर्त्यांची मदत घ्यावी. शिस्त पाळून समाजजीवन सुरु राहायला हवं. लोकांना रेशन द्या. काही द्यायचं नाही आणि नियम लावायचे याला अर्थ नाही, अशी टीकाही गिरीश बापट यांनी केली आहे. तसंच संध्याकाळी ६ वाजेपासून सुरु होणाऱ्या संचारबंदीला विरोध करताना रात्री ८ पासून संचारबंदी करा, अशी मागणीही बापट यांनी केली आहे.