पंढरीच्या आषाढी पायवारीसाठी ‘बायो-बबल’ पद्धतीचा अवलंब करीत काही निवडक वारकर्यांना परवानगी देण्यात यावी, या मागणीसाठी वारकरी शिष्टमंडळाने आज विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. वारीचा कालावधी, संख्येवरील निर्बंधांसह मार्गावरील सर्व गावांचा ठराव असे अनेक प्रस्ताव शिष्टमंडळाने फडणवीस यांना दिले आहेत. याबाबत आपण मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, कोव्हिड-१९ च्या नियमांचे पालन करत पायवारी करता यावी, तसेच शेकडो वर्षांच्या गौरवशाली परंपरेत खंड पडू नये, असा अतिशय व्यवहार्य प्रस्ताव वारकरी शिष्टमंडळाने मांडला आहे. त्यामुळे यासंदर्भात मी स्वत: मुख्यमंत्र्यांकडे याबाबत पाठपुरावा करेन.
विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सदस्य शिवाजी महाराज मोरे, संत तुकाराम महाराज संस्थान देहूचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे, विश्वस्त माणिक महाराज मोरे, अध्यात्मिक समन्वय आघाडीचे अध्यक्ष आचार्य तुषार भोसले, संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे भाऊ महाराज फुरसुंगीकर, संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्याचे संजय महाराज धोंडगे, वारकरी संघटनांचे प्रतिनिधी रमेश महाराज वाघ, विकास घांग्रेकर यांच्यासह वारकरी संप्रदायाचे प्रतिनिधी या भेटीवेळी उपस्थित होते.
दरम्यान, यंदाच्या आषाढी वारीसाठी किमान १०० वारकऱ्यांसोबत पायी पंढरीला जाण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी आळंदी आणि देहू संस्थानाच्या विश्वस्तांनी केली आहे. पुणे विभागीय आयुक्तांसोबत झालेल्या बैठकीत त्यांनी हा प्रस्ताव मांडला. आता विभागीय आयुक्त हा प्रस्ताव शासनाकडे पाठवतील. गेल्या अनेक दिवसांपासून वारकरी संप्रदाय आषाढी वारीला परवानगी देण्याची मागणी करत आहे. त्यामुळे आता राज्य सरकार पंढरपूरच्या पायी वारीला अंशत: मान्यता देणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
आषाढी वारी पालखी सोहळ्याबाबत विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली समितीची बैठक विभागीय आयुक्त कार्यालयात झाली. या समितीने वारकऱ्यांच्या सर्व सूचना ऐकून घेतल्या. आता समितीकडून एक अहवाल शासनाकडे पाठवला जाणार असल्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी सांगितले.यावेळी वारकरी संप्रदायातील मान्यवरांसोबत पालखी सोहळ्याबाबत चर्चा करण्यात आली. या बैठकीला विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया, पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश, पुणे, सातारा व सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तसेच तीनही जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक उपस्थित होते.
हे ही वाचा:
मुळशीमधील कंपन्यांत घुसून पाहणी करु
सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाच्या केसेस लाखापेक्षा कमी
फ्रेंच राष्ट्राध्यक्षांच्या श्रीमुखात
श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांची आषाढी पायी वारीला वारकरी संप्रदायात ऐतिहासिक महत्त्व आहे. अनेक वर्षाची या वारीला परंपरा आहे, राज्यात कोरोना संसर्गाचा वाढता धोका लक्षात घेत पुढील पंधरा दिवसातील कोरोना स्थिती पाहून पुन्हा वारकरी संप्रदायातील मान्यवरांशी चर्चा करुन आणि विश्वासात घेवूनच अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी सांगितले होते.