ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांचा बिजू जनता दल (बीजेडी) २८ मे रोजी होणाऱ्या नवीन संसद भवनाच्या उद्घाटन समारंभाला उपस्थित राहणार आहे. तसे बीजेडीच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे.
‘या घटनात्मक संस्था कोणत्याही मुद्द्यांपेक्षा श्रेष्ठ आहेत, यावर बिजू जनता दलाचा विश्वास आहे. अन्य मुद्द्यांवर नंतर कधीही चर्चा होऊ शकते. त्यामुळे आमचा पक्ष हा या महत्त्वाच्या प्रसंगाचा एक भाग असेल,’ असे बीजेडीचे राष्ट्रीय प्रवक्ते सस्मित पात्रा यांनी जाहीर केले.
“भारताचे राष्ट्रपती हे भारताचे प्रमुख आहेत. संसद ही भारतातील १.४ अब्ज लोकांचे प्रतिनिधित्व करते. दोन्ही संस्था भारतीय लोकशाहीचे प्रतीक आहेत आणि भारतीय राज्यघटनेतून त्यांना हे अधिकार प्राप्त झाले आहेत. त्यांचे अधिकार आणि श्रेष्ठत्व नेहमीच सुरक्षित ठेवले पाहिजेत,’ असे पात्रा म्हणाले.
१९ विरोधी पक्षांनी संसद भवनाच्या उद्घाटन कार्यक्रमावर बहिष्कार टाकल्यानंतर ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्या पक्षाने मात्र त्यांचा पक्ष या कार्यक्रमास उपस्थित राहात असल्याचे जाहीर केले आहे. मुख्यमंत्री नवीन पटनायक यांचे पंतप्रधान मोदींसोबत चांगले वैयक्तिक संबंध असल्याचे सांगितले जाते.
सद्यस्थितीत उद्घाटन कार्यक्रमावर १९ पक्षांनी बहिष्कार टाकला आहे. त्यात, काँग्रेस, द्रमुक, आप, तृणमूल काँग्रेस, शिवसेना (उद्धव ठाकरे गट), समाजवादी पार्टी, भारतीय कम्युनिस्ट पार्टी (सीपीआय), झारखंड मुक्ती मोर्चा, केरळ काँग्रेस (मणी), विदुथलाई चिरुथाईगल काची, राष्ट्रीय लोक दल, संयुक्त जनता दल, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, भारतीय कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी), राष्ट्रीय जनता दल, इंडियन युनियन मुस्लिम लीग, नॅशनल कॉन्फरन्स, रिव्होल्युशनरी सोशालिस्ट पार्टी आणि मारुमलार्ची द्रविड मुन्नेत्र कळघम यांचा समावेश आहे.
हे ही वाचा:
संसद भवनाला विरोध करणारे उद्घाटनाच्या गोष्टी करताहेत!
मुंबई इंडियन्स ‘आकाश’ भरून पावले
कोकणातील गाड्यांचे आरक्षण एका मिनिटात कसे फुल होते?
जितेंद्र आव्हाड हेच करमुसे अपहरण प्रकरणाचे सूत्रधार
या संसद भवनाचे उद्घाटन दोन्ही सभागृहांचे प्रमुख म्हणून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी करावे, अशी विरोधी पक्षांची मागणी आहे.