मुंबई महानगरपालिकेत विविध विभागामध्ये जुने निरुपयोगी व भंगार सामानाचा लिलाव करण्यासाठी महापालिकेतर्फे निविदा काढल्या जातात. या भंगार सामानाच्या निविदांसाठी भंगार सामानाच्या डीलर्सचे एक मोठे रॅकेट महापालिकेत गेली ५० वर्ष कार्यरत आहे. या रॅकेट मधील डीलर्स पैकी काही डीलर्स कंपनी एकाच मालकाच्या आहेत. आणि काही कंपन्या एकाच पत्त्यावर आहे. ह्या सर्व रॅकेटमुळे महापालिकेचे दरवर्षी करोडो रुपयाचे नुकसान होत आहे, असे स्थायी समितीचे नामनिर्देशित नगरसेवक भालचंद्र शिरसाट यांनी म्हटले आहे.
हे रॅकेट नवीन निविदाकाराला आत मध्ये शिरूच देत नाहीत. भंगाराच्या निविदांत स्पर्धाच होऊ देत नाहीत. इतकेच नव्हे तर महापालिकेच्या अधिकाऱ्यांना वेठीस धरून आपली एकाधिकारशाही जोपासत आपल्या बगलबच्च्यांमार्फत महापालिकेची राजरोजपणे कोट्यवधीची लुट करत आहेत. त्याबाबत काही वास्तविक व सत्यनिष्ठ बाबी आपल्या निदर्शनास खालील प्रमाणे आणू इच्छितो, असे शिरसाट म्हणतात.
१) A.A. Auctioners & Contractors Pvt. Ltd. ही कंपनी महापालिकेच्या वतीने महापालिकेच्या जुन्या भंगार गाड्यांचा लिलाव करते. या कंपनीचे संचालक (मालक) अब्दुल हसन अली खान आणि इमरान अब्दुल हसन अली खान असून त्यांचा नोंदणीकृत पत्ता शॉप नं. २०, महापालिका शाळे समोर, लिंक रोड, कोहिनूर सोसायटी, साकीनाका, मुंबई ४०० ०७२ असा आहे.
२) महापालिकेच्या जुन्या भंगार गाड्यांच्या लिलावात सहभागी होणारे दोन मोठे डीलर्स मेसर्स गरीब नवाज कॉर्पोरेशन व मेसर्स अख्तर इंटरप्रायजेस (M/s. Akhtar Enterprises) आहेत.
३) महापालिकेच्या लिलावात सहभागी होणारा एक डीलर कंपनी मेसर्स गरीब नवाज कॉर्पोरेशन यांचाही पत्ता शॉप नं. २०, महापालिका शाळे समोर, लिंक रोड, कोहिनूर सोसायटी, साकीनाका, मुंबई ४०० ०७२ असा आहे. या कंपनीचा मालक अब्दुल हसन अली खान हाच आहे.
४) महापालिकेच्या लिलावात सहभागी होणारा आणखी एक डीलर कंपनी मेसर्स अख्तर इंटरप्रायजेस (M/s. Akhtar Enterprises) यांचाही पत्ता शॉप नं. २०/बी, महापालिका शाळे समोर, लिंक रोड, कोहिनूर सोसायटी, साकीनाका, मुंबई ४०० ०७२ असा आहे. आणि त्यांचे मालक अख्तर हसन अली खान आहेत. अब्दुल व अख्तर हे एकाच कुटुंबातील सख्खे भाऊ आहेत.
५) मेसर्स A.A. Auctioners & Contractors Pvt. Ltd. महापालिकेच्या जुन्या व भंगार गाड्यांच्या लिलावाची किंमत ठरवितात आणि लिलावाचे आयोजन करतात. आणि या लिलावात सहभागी आणि पात्र होतात गरीब नवाज कार्पोरेशन आणि मेसर्स अख्तर इंटरप्रायजेस ! म्हणजेच महापालिकेच्या वतीने लिलाव करणारा आणि लिलावात सहभागी होणारा लाभार्थी या दोघांचाही पत्ता सारखाच आणि मालकही सारखेच आहेत ! मग स्पर्धा कसली ? ही तर एकाधिकारशाही !
६) मेसर्स तवाब हुसैन स्क्रॅप ट्रेडर्स (M/s Tawab Hussain Scrap Traders), मेट्रो इंटरप्रायजेस (Metro Enterprises), नशिबदार मुसाहीब ऍन्ड कंपनी (Nasibdar Musahib & Co.) या तीनही वेगवेगळ्या स्क्रॅप डीलर कंपनीचा पत्ता मात्र एकाच ठिकाणी म्हणजे गाळा क्र. ३१० छत्रपती शिवाजी कुटीर मंडळ, अनिस कंपाउंड, कोहिनूर सोसायटी, एल.बी.एस. मार्ग, कुर्ला (प), मुंबई – ४०० ०७० असा आहे. आश्चर्य म्हणजे या तीनही कंपन्या आपापसात कंत्राट निविदेत स्पर्धा करतात आणि कंत्राट गिळंकृत करतात.
७) सोबत महापालिकेत भंगार सामानाच्या लिलावात भाग घेणाऱ्या विविध भंगार डीलर्सची यादी जोडीत आहे. ही यादी पाहता आपणांस बहुतांश डीलर्स साकीनाका परिसरातील एकाच ठिकाणी व इतर साकीनाका – कुर्ला एल.बी.एस. मार्ग – कुर्ला बस डेपो परिसराच्या जवळपास असल्याचे लक्षात येते. यापैकी एकाच मालकाच्या दोन ते तीन कंपन्या असून त्या स्पर्धात्मक लिलावात सहभागी होतात. आणि निकोप (?) स्पर्धा होऊन आपापसात भंगाराचा लिलाव करतात. महापालिकेचे करोडो रुपयाचे नुकसान करतात.
८) गेली ५० वर्षे वेगवेगळ्या कंपनीच्या नावाने भंगाराच्या लिलावावर रफिक चाचा मेसर्स यूनाईटेड कोर्पोरेशन यांचेच अधिराज्य होते. त्यांच्या परवानगी शिवाय या धंद्यात कोणालाही प्रवेश नव्हता. रफिक चाचा यांचे कार्टेल सर्व भंगाराचा लिलाव करीत असत. त्यामुळे महापालिकेला कधीही भंगाराचा योग्य मोबदला मिळाला नाही. नुकतेच रफिक चाचा यांचे निधन झाल्यामुळे त्यांचा कार्यभार त्यांचे कुटुंबीय अब्दुल हसन अली खान सांभाळत आहेत असे कळते.
९) आता नवीन विजेवर चालणाऱ्या ई गाड्यांची खरेदी मोठ्या प्रमाणावर होणार आहे. त्यामुळे साहजिकच जुन्या गाड्या मोठ्या प्रमाणावर भंगारात काढल्या जातील. पुन्हा एकदा महापालिकेला या रॅकेटमुळे करोडो रुपयांचे नुकसान सोसावे लागणार आहे.
हे ही वाचा:
ठाकरे सरकारविरोधात समीर वानखेडे गेले उच्च न्यायालयात
मध्यरात्रीपासून एसटी कर्मचारी बेमुदत संपावर
प्रशांत किशोर म्हणतात, पुढील अनेक दशके भाजपाच
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना करोनाने पुन्हा गाठले!
शिरसाट यांनी पालिकेला आवाहन केले आहे की, आपण A.A. Auctioners & Contractors Pvt. Ltd. या भंगार गाडी लिलाव करण्याऱ्या कंपनीची व या लिलावात भाग घेणाऱ्या २१ कंपन्यांची दक्षता विभागातर्फे चौकशी करून, लेखा परीक्षण विभागातर्फे लेखा परीक्षण करून आवश्यकता वाटल्यास महापालिकेचे शेकडो कोटी रुपयांचे नुकसान करणाऱ्या या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकावे आणि त्यांच्यावर फसवणुकीचा फौजदारी खटला भरावा अशी मागणी आम्ही या पत्राद्वारे करीत आहोत.
महापालिकेतील भंगार सामानाच्या लिलावात या सर्व टोळक्याने वर्षानुवर्षे कशी लूट केली आहे याचे आणखी एक उदाहरण खालीलप्रमाणे आहे-
स्थायी समिती २१ .१०.२०२० च्या कार्यक्रम पत्रिकेवरील विषय क्र. १३६ – मुंबई महानगरपालिका रुग्णालये, प्रसुतिगृहे, दवाखाने, विभाग कार्यालये आणि महानगरपालिकेतील विविध खाती व त्यांचा परिसर अडगळमुक्त करण्यासाठी व आरोग्यदायी ठेवण्यासाठी भंगारमालाची त्वरित विल्हेवाट लावण्याकरिता द्वैवार्षिक करार करण्याबाबत पहावा. या प्रस्तावातील तक्ता क्र. अ मध्ये वर्ष २०१७ ते २०१९ या कालावधीसाठी उपरोक्त डीलर रॅकेटने दिलेले दर हे वर्ष २०२० च्या निम्मे आहेत असे दिसते. १४.०२.२०२० मध्ये या डीलर रॅकेटच्या एकाधिकारशाहीस छेद देत एम.एस. स्क्रॅपसाठी पूर्वीच्या रु. १५.११ ऐवेजी रु. ३२.२१ असा दुप्पटीहून अधिक दर तसेच इतर सामान लाकडी भंगार, वापरलेले एक्सरे फिल्म, हायपोवॉटर, प्लास्टिक स्क्रॅप, चिंधी, पोते, तांबे, काचेच्या बाटल्या, ओतीव लोखंड आदी बाबींसाठी ४०% ते ६०% जास्त दर देऊ करत मे. ए.आय.एफ.एस.ओ. टेक्नोलॉजीस प्रा.लि. यांनी हि एकाधिकारशाहीस प्रथमत: आव्हान दिले. अर्थात त्यांना प्रचंड विरोध न्यायालयीन याचिका यांचा सामना करावा लागला.
२७/१०/२०२१ रोजीच्या स्थायी समितीच्या कार्यक्रमपत्रिकेवरील विषय क्र. ५ पहावा. प्रमुख अग्निशमन अधिकारी खात्यातील भंगार वाहनांचा ई लिलाव अशाच प्रकारे होत आहे. या ई लिलावात भंगार गाड्या जीप्स, पाण्याचे टँकर, ट्रक्स आदींचा लिलाव काही हजारात झालेला आहे. प्रत्यक्षात लोखंडाचे आणि भंगार गाड्यांमधील इतर स्पेअर पार्टसचे दर पाहता या ई लिलावात नमूद केलेले दर अत्यल्प आहेत. त्यामुळे महापालिकेचे या ई लिलावात काही लाखांचे नुकसान झालेले आहे.
वरील एका उदाहरणावरून उपरोक्त भंगार डीलर रॅकेटच्या एकाधिकारशाहीमुळे महापालिकेचे वर्षानुवर्षे करोडो रुपयाचे आर्थिक नुकसान झाल्याचे स्पष्ट होते. सदर बाब अत्यंत गंभीर आहे. तरी बाबत आपण महापालिकेचे प्रमुख म्हणून जातीने लक्ष घालून व मागील भंगार सामान लिलावाचा तपशील तपासून आणि मागील भंगार लिलावाची दक्षता विभागाकडून चौकशी / शहनिशा करावी तसेच मुख्य लेखा परीक्षक यांच्याकडून सदर भंगार निविदांचे लेखा परीक्षण करावे.