शिंदे- फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; पेट्रोल पाच रुपयांनी, डिझेल तीन रुपयांनी स्वस्त

शिंदे- फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; पेट्रोल पाच रुपयांनी, डिझेल तीन रुपयांनी स्वस्त

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. यावेळी शिंदे फडणवीस सरकारने सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळेल असे महत्वाचे निर्णय घेतले आहेत. राज्यात पेट्रोल पाच रुपयांनी आणि डिझेल तीन रुपयांनी स्वस्त होणार आहे, अशी मोठी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, आजच्या कॅबिनेटमध्ये जनतेच्या हिताचे अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. देशात पेट्रोल डिझेलचे दर हे कच्च्या तेलावर अवलंबून आहेत. मात्र आंतरराष्ट्रीय पातळीवर तेलाचे भाव वाढत आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने ४ नोव्हेंबर २०२१ आणि २२ मे २०२२ ला पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात केली होती. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्व राज्यांना पेट्रोल डिझेलचे भाव कमी करण्याचे आवाहन केले होते. तरीही काही राज्यांनी भाव कमी केले नव्हते यामध्ये महाराष्ट्राचाही समावेश होता. सध्या राज्यात युतीचे सरकार आहे आणि राज्याची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन जनतेच्या हिताचे निर्णय घेण्यात आले आहेत. यानुसार राज्यात पेट्रोल पाच रुपयांनी तर डिझेल तीन रुपयांनी स्वस्त होणार असल्याचे मुख्यंमत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहे. यामुळे शासनाच्या तिजोरीवर सहा हजार कोटी रुपयांचा भार पडणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.

भारत स्वातंत्र्याची ७५ वर्षे साजरी करत आहे. या आझादीच्या अमृत महोत्सवच्या निमित्ताने मोदी सरकारकडून एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. वयवर्षे १८ ते ५९ नागरिकांना पुढील ७५ दिवसांसाठी बूस्टर डोस मोफत देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राज्यात करण्यास सांगितली आहे. यामुळे वाढत्या कोरोनाच देशात प्रभाव कमी होईल आणि सक्रिय रुग्णानाची संख्या कमी होईल, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. तसेच स्वच्छ भारत अभियान टप्पा दोन राबवण्यात येणार आहे. केंद्र पुरस्कृत अमृत अभियान टप्पा दोन राज्यात राबवण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे.

पुढे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये अनुदान देण्यात येणार आहेत. यामध्ये कोल्हापूर, सातारा आणि सांगली या पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांना वगळण्यात आले होते. मात्र खासदार धैर्यशील माने आणि आमदार प्रकाश आबिटकर यांच्यसह अनेक आमदारांनी मला या शेतकऱ्यांना अनुदान देण्यात यावं अशी विनंती केली आहे. त्यानुसार पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांना देखील अनुदान मिळणार आहे. याचा निर्णय पुढच्या कॅबिनेटमध्ये घेतला जाणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले आहेत. तसेच सरपंच, नगराध्यक्ष हे थेट आता लोकांमधूनच निवडले जाणार आहेत. याशिवाय बाजार समितीत शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार असणार आहे, अशी मोठी घोषणा मुख्यमंत्री शिंदे यांनी केली आहे.

हे ही वाचा:

पाकिस्तानात हिंदू मुलीचे बळजबरीने धर्मांतर करून मुस्लिम मुलाशी लग्न

असंसदीय शब्दांची यादी जाहीर; वाचा सविस्तर

अतिवृष्टीमुळे ‘या’ जिल्ह्यातील शाळांना सुट्टी

अध्यक्ष राजपक्षे यांच्या पलायनानंतर श्रीलंकेत आणीबाणी लागू

आणीबाणीच्या काळात ज्या लोकांना तुरुंगात राहावं लागलं होतं. अनेक राज्यात पेन्शन दिली जात होती. त्यांना पेन्शन देण्याचा निर्णय महाराष्ट्रातही घेतला होता. पण मागच्या सरकारने तो रद्द केला होता. पुन्हा हा निर्णय आम्ही घेतला आहे. याचा ३ हजार ६०० लोकांना लाभ मिळणार आहे, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

Exit mobile version