ममता बॅनर्जींना धक्का, या बड्या नेत्याचा राजीनामा…..

ममता बॅनर्जींना धक्का, या बड्या नेत्याचा राजीनामा…..

एप्रिल-मे २०२१ मधील पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांपूर्वी तृणमूल कॉंग्रेसला मोठा धक्का बसला आहे. तृणमूल काँग्रेस पक्षाचे राज्यसभा खासदार आणि माजी रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांनी शुक्रवारी राज्यसभेचा राजीनामा जाहीर केला. कारण म्हणून त्यांनी पश्चिम बंगालच्या सद्यस्थितीत कोणताही बदल घडवून आणण्यासाठी राज्यसभेचे खासदार म्हणून आपली भूमिका अपुरी असल्याचे नमूद केले. पश्चिम बंगालसाठी काम करण्याची इच्छा आहे असेही त्यांनी सांगितले. सध्या पश्चिम बंगालमध्ये सुरु असलेल्या राजकीय हिंसाचाराचाही त्यांनी निषेध केला.

सुवेन्दु अधिकारी यांच्यासह अनेक प्रतिष्ठित नेते तृणमूल काँग्रेसमधून राजीनामा देऊन अलीकडेच भाजपामध्ये गेले आहेत. राज्यसभेचे उपाध्यक्ष हरिवंश नारायण सिंग यांना विनंती करून त्रिवेदी यांनी अचानक राज्यसभेतून राजीनामा दिला.

“प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात एक क्षण असा येतो जेव्हा त्याचा किंवा तिचा आतला आवाज काहीतरी सांगत असतो. आज राज्यसभेत चर्चा ऐकत असताना आपण  राजकारणात का आहोत असा विचार करत असताना माझ्याही आयुष्यात असाच एक क्षण आला. दोन दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदी आणि गुलाम नबी आझाद सभागृहात बोलले. दोन पक्षांचे प्रतिनिधित्व करणार्या या दोन नेत्यांना जोडणारा धागा होता तो म्हणजे देश.” असे दिनेश त्रिवेदी म्हणाले. “पक्ष हा देशापेक्षा मोठा आहे का किंवा व्यक्ती सर्वश्रेष्ठ आहे का हा विचार करण्याची वेळ आपल्या आयुष्यात येते.” असा टोलाही त्रिवेदी यांनी ममता बॅनर्जींना लगावला.

हेही पहा:

नंदीग्राम पुन्हा ममतांना तारणार का?

“ज्याप्रकारे माझ्या (पक्षाच्या) बाजूने हिंसाचार केला जात आहे, लोकशाहीवर हल्ला होत आहे. ते पाहून मला अस्वस्थ वाटू लागले आहे. मी इथे बसून अस्वस्थ होत आहे. मी सुभाषचंद्र बोस, खुदीराम बोस, रवींद्रनाथ टागोर यांच्या भूमीतून येतो.” असे त्रिवेदी म्हणाले.

स्वामी विवेकानंदांच्या ‘उठा, जागे व्हा’ याचा उल्लेख करत खासदार त्रिवेदी असे म्हणाले की, “माझा आतला आवाज मला सांगत आहे की, मी इथे बसून माझ्या राज्यात काही करू शकत नाही, त्यामुळे मी राजीनामा दिलेला बरा.”

दिनेश त्रिवेदी येत्या काही दिवसांमधेच भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे.

Exit mobile version