भूपेंद्र पटेल हे गुजरातचे नवे मुख्यमंत्री असणार आहेत. रविवार १२ सप्टेंबर रोजी पार पडलेल्या भारतीय जनता पार्टीच्या विधिमंडळ गटाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. यावेळी भूपेंद्र पटेल यांना विधिमंडळ गटाचे नेता निवडण्यात आले. भूपेंद्र पटेल यांची निवड सर्वांसाठीच आश्चर्याचा धक्का होती. त्यामुळे या निवडीतून पुन्हा एकदा नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या राजकीय धक्कातंत्राची प्रचिती आल्याचे म्हटले जात आहे.
गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनी अनपेक्षितरीत्या शनिवार ११ सप्टेंबर रोजी आपला राजीनामा सादर केला. त्यांनी राज्यपालांकडे आपला राजीनामा सुपूर्द करत आपण यापुढे संघटनेसाठी काम करणार असल्याचे सांगितले. तेव्हापासूनच गुजरातचे पुढचे मुख्यमंत्री कोण होणार? याबद्दल प्रचंड चर्चा रंगलेल्या दिसल्या. आज रविवार, १२ सप्टेंबर रोजी भारतीय जनता पार्टीची एक अत्यंत महत्वपूर्ण बैठक ठरवण्यात आली होती. दुपारी तीन वाजता ही बैठक पार पडली. या बैठकीत गुजरात विधानसभेतील भाजपच्या विधीमंडळ गटाचे नेते भूपेंद्र पटेल यांचे नाव एकमताने निश्चित झाले. त्यामुळे भूपेंद्र पटेल हे गुजरातचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
हे ही वाचा:
शिवसेना उत्तर प्रदेश निवडणूकीच्या रिंगणात! यावेळी तरी डिपाॅझिट वाचणार?
ठाकरे सरकार बेजबाबदार आणि असंवेदनशील! महिला आयोगाचे ताशेरे
आणखीन एका बलात्काराच्या घटनेने महाराष्ट्र सुन्न झाला…नराधम अटकेत
रोनाल्डोचे दणक्यात पुनरागमन! युनायटेडने मारला गोल्सचा चौकार
या बैठकीला माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी, उपमुख्यमंत्री नितीन पटेल गुजरात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सीआर पाटील, केंद्रीय पर्यवेक्षक नरेंद्र सिंह तोमर, प्रल्हाद जोशी आणि तरुण चूग हे उपस्थित होते.
भूपेंद्र पटेल हे घाटलोडीया मतदारसंघाचे आमदार म्हणून प्रतिनिधित्व करतात. २०१७ च्या गुजरात विधानसभा निवडणुकीत ते विक्रमी मतांनी निवडून आले होते. त्यांनी काँग्रेसच्या शशिकांत पटेल यांचा १,१७,००० मतांनी पराभव केला होता