राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी येवल्यात सभा घेऊन छगन भुजबळ यांना लक्ष्य केले. त्यात त्यांनी आपल्या वयावरून जे टीका करतात त्यांना इशारा दिला. आपल्याला वयावरून कुणी बोलले तर याद राखा असा दम त्यांनी भरला. खरे तर हा इशारा त्यांनी अजित पवारांना दिला असावा. अजित पवारांनी शरद पवारांना आता वय झाले, थांबा असे आवाहन केले होते. ते शरद पवारांना चांगलेच झोंबले आहे. मात्र शरद पवारांचे कार्यकर्ते अगदी त्यांची कन्या सुप्रिया सुळे मात्र या वयातही शरद पवार कसे रणांगणात खंबीरपणे उभे आहेत, असा दावा करत त्यावर ट्विट केले होते. एकूणच शरद पवार या वयातही योद्धा आहेत असा या सगळ्यांचा सूर आहे. पण याच वयामुळे त्यांच्या पक्षात बंडाळी झाले असे मानले जात आहे.
मात्र पक्षातील बंडाचे केवळ हेच एक कारण नाही, हे आता समोर आले आहे. छगन भुजबळ यांनी नाशिकमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत शरद पवारांवर टीका करत त्यांच्या पक्षातील बंडाळीमागील खरे कारण स्पष्ट केले.
भुजबळ यांनी विविध उदाहरणे देऊन शरद पवार यांचा स्वभाव, त्यांचे राजकारण यावर प्रकाश टाकला आहे. भुजबळ यांच्या म्हणण्याप्रमाणे शरद पवारांनी अनेक निर्णय घेतले पण त्यावर ते ठाम राहिले नाहीत. त्यांच्या धरसोड वृत्तीमुळे, बेभरवशाच्या राजकारणामुळेच त्यांच्यावर ही वेळ आली आहे. अर्थात भुजबळ यांनी हे जे कारण काही उदाहरणांसह पटवून दिले आहे त्याविषयी यापूर्वीही बोलले गेले आहे. पण तेव्हा ते आरोप विरोधकांनी केलेले होते. त्यामुळे तो विरोधकांचा अजेंडा असल्याचे बोलले गेले. पण आता स्वतः भुजबळांसारखे पवारांसोबत अनेक वर्षे राजकारण केलेल्या व्यक्तीने हे स्पष्टीकरण दिल्यामुळे त्याला वेगळे महत्त्व आहे.
शरद पवार यांनी येवल्याच्या सभेत भुजबळांवर शरसंधान करताना त्यांना तिथे उमेदवारी देण्याचा निर्णय चुकला असे म्हटले होते. त्यावर भुजबळ म्हणाले की, खरे तर येवल्यात आपल्याला शरद पवारांनी उभे केले नाही तर तिथल्या जनतेचे हे मत होते की आपण तिथे उभे राहावे. पवारांनी तेव्हा जुन्नरमधून आपल्याला निवडणूक लढविण्यास सांगितले होते पण येवल्याच्या लोकांचे म्हणणे होते की, विकासासाठी आपण तिथून उभे राहावे. त्यामुळे पवार जे म्हणत आहेत की, भुजबळांसंदर्भातील आपला अंदाज चुकला तर ते चुकीचे बोलत आहेत, येवला हा मतदारसंघ आपणच निवडला होता आणि तिथे आपल्याला ४ वेळा लोकांनी निवडून दिले. म्हणजे थोडक्यात शरद पवारांनी छगन भुजबळांवरच खापर फोडले आणि त्यांच्याबाबत आपला अंदाज चुकल्याची पुडी सोडली.
पवारांचे हे असे बेभरवशाचे, विश्वासार्हता नसलेले राजकारण गेले अनेक वर्षे सुरू आहे. त्याबद्दल अनेकांनी बोलून झाले आहे फक्त आता त्यांच्याच पक्षातील लोक ते बोलत आहेत.
भुजबळ म्हणाले की, २०१४, २०१७, २०१९ या वेळी शरद पवारांनी भाजपासोबत जाण्याचे ठरविले होते. त्यासाठी फक्त भाजपाने शिवसेनेची साथ सोडावी अशी त्यांची अपेक्षा होती. २०१४मध्ये भाजपाला बाहेरून पाठिंबाही त्यांनी दिला नंतर तो काढून घेतला. २०१९लाही भाजपासोबत जाण्याची तयारी होती. एकनाथ शिंदे यांचे बंड होण्यापूर्वी ती तयारीही केली होती पण आयत्या वेळेला त्यांनी त्यातून माघार घेतली. त्यामुळे अजित पवारांनी मग फडणवीसांसह पहाटेचा शपथविधीही केला.
हे ही वाचा:
‘वंदे भारत ट्रेन’ आता केसरी रंगात दिसणार!
कोविड घोटाळा प्रकरणात दंड केलेल्या कंत्राटदारालाच ३०० कोटींचं कंत्राट !
घरातल्या पदार्थातून टॉमेटो झाला गायब; कोकम, लिंबू, चिंचेला आले महत्त्व
सत्तेत असताना जे मंत्रालयात गेले नाही ते आता विदर्भात आलेत!
भुजबळांच्या या कबुलीतून ही गोष्ट स्पष्ट होते की, या परिस्थितीत शरद पवारांनी सातत्याने धरसोडीचे राजकारण केल्याचेच दिसते. त्यावर कहर म्हणजे आपल्या आत्मचरित्रात्मक पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात शरद पवारांनी आपण राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून पायऊतार होत असल्याचे सांगितले आणि खळबळ उडवून दिली. त्यावर भुजबळ म्हणाले की, हा निर्णय मात्र पवारांनी १५ दिवस आधीच घेतला होता. त्यावेळी अजित पवार, सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत त्यांनी ठरविले होते की, आपण पायउतार होत असल्याचे जाहीर करू त्यानंतर तुम्हाला काय करायचे ते करा. प्रत्यक्ष ही घोषणा केल्यानंतर तीन दिवसांनी शरद पवारांनी आपला निर्णय फिरविला. त्यांच्या या अशा वागण्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेसमधून अनेक लोक आता बाहेर पडले असले पाहिजेत, हे भुजबळांच्या विधानांवरून लक्षात येते.
निर्णय घ्यायचे पण पण ते पवारांकडून फिरवले जाण्याची शक्यता अधिक. तसेच या सगळ्या प्रकरणात दिसून आले. त्यामुळे केवळ वयाच्या मुद्द्यावर शरद पवारांबाबत त्यांच्या पक्षातील नेत्यांना आक्षेप नाही तर त्यांचे हे असे बेभरवशी वागणेही त्याला कारणीभूत आहे. परिणामी, ईडी, सीबीआय कारवाईमुळे हे सगळे नेते पक्षातून बाहेर पडले असे म्हटले जात असले तरी खरे कारण हेच आहे की, शरद पवारांच्या या धरसोडीच्या राजकारणाला हे सगळे कंटाळले होते. आपली कारकीर्द कितीवेळ अशा अधांतरी राजकारणावर अवलंबून ठेवायची असा प्रश्न या नेत्यांना पडला असेल तर आश्चर्य वाटायला नको.