भ्रष्टाचाराच्या आरोपात अडकलेले शिवसेना नेते अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) प्रश्नांना तोंड देण्यासाठी टाळाटाळ करत आहेत. यवतमाळच्या शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांना ट्रस्ट घोटाळा प्रकरणी ईडीने सोमवारी (४ ऑक्टोबर) रोजी चौकशीसाठी बोलावले होते. मात्र त्या ईडी कार्यालयात हजर राहिल्या नाहीत. या प्रकरणी गवळींचा सहकारी खानला ईडीने अटक केली आहे. खासदार गवळी यांनी ईडीसमोर हजर राहण्यासाठी १५ दिवसांचा वेळ मागितला आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, तपास एजन्सीला भावना गवळी आणि खान यांची समोरासमोर चौकशी करण्याची इच्छा होती, परंतु गवळी यांनी आता अधिक वेळ मागितला आहे. यानंतर, ईडी देखील तपासाचा हवाला देत खानच्या कोठडीची मुदतवाढ मागू शकते. काही दिवसांपूर्वी भावना गवळी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही भेट घेतली. ईडीने १८.१८ कोटी रुपयांच्या आर्थिक अनियमितता प्रकरणात गवळी आणि इतर आरोपींविरोधात मनी लाँडरिंगचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. तपासादरम्यान तपास यंत्रणेला ६९ कोटींच्या गैरव्यवहाराचे पुरावे सापडले आहेत.
हे ही वाचा:
मंदिरांत लसवंतच घालू शकणार दंडवत!
मुंबई पालिका म्हणतेय, छट्, तिसरी लाट वगैरे काही येणार नाही!
‘हा’ अवलिया बेटावर तब्बल ३२ वर्षे एकटाच राहत होता… वाचा सविस्तर
खान याच्या कस्टोडियल अर्जात ईडीने दावा केला आहे की, भावना गवळींच्या सांगण्यावरून आर्थिक अनियमितता झाली होती आणि त्या रिसोड अर्बन को- ऑपरेटिव्ह सोसायटीच्या अध्यक्षा होत्या त्यामुळे पैसे काढण्याचे आदेश देण्याचे अधिकार त्यांना देण्यात आले होते.
गेल्या वर्षी मे महिन्यात भावना गवळी यांनी महिला उत्कर्ष प्रतिष्ठानमध्ये १८.१८ कोटी रुपयांच्या आर्थिक अनियमिततेचा आरोप करत वाशिमच्या रिसोड पोलीस ठाण्यात त्यांचे खासगी सचिव अशोक गंडोले यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला होता. या एफआयआरच्या आधारे, ईडीने पीएमएलए कायद्याअंतर्गत ईसीआयआर नोंदवून तपास सुरू केला आणि भावना गवळी या आर्थिक फसवणुकीच्या खेळाची मास्टर माइंड असल्याचे आढळले. त्यांनी खान आणि इतर आरोपींच्या मदतीने महिला उत्कर्ष प्रतिष्ठान नावाच्या ट्रस्टचे एका कंपनीत रूपांतर केले. यानंतर बनावट कागदपत्रांच्या मदतीने ट्रस्टची ६९ कोटी रुपयांची मालमत्ता कंपनीला देण्यात आली.