शिवसेना खासदार भावना गवळी यांना आज, ५ मे रोजी ईडी कार्यालयात हजर राहण्याचे समन्स ईडीकडून पाठवण्यात आले होते. मात्र, भावना गवळी या आजही ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहणार नसल्याची माहिती आता समोर आली आहे. ईडीकडून आणखी काही वेळ मागून घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे ईडीकडून वेळ वाढवून दिला जाणार का? की पुढे भावना गवळी यांच्यावर कारवाई होणार याकडे लक्ष असणार आहे.
ईडीने भावना गवळी यांना २९ एप्रिल रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानंतर आजही भावना गवळी हजर राहणार नाहीत. त्यांचे वकील आज ईडीकडून वेळ मागणार आहेत. याआधीही ईडीने भावना गवळी यांना समन्स बजावले होते. मात्र, त्यांनी वेगवेगळी कारणं देत चौकशीला येऊ शकत नाही असं म्हणत अनुपस्थिती दर्शविली होती. चौकशीसाठी हजर न झाल्यास ईडी अजामीनपात्र वॉरंट काढण्याची शक्यता असल्याची चर्चा होती. त्यामुळे ईडी आता कोणती कारवाई करणार याकडे लक्ष असणार आहे.
हे ही वाचा:
कान्स चित्रपट महोत्सवात भारताला ‘कंट्री ऑफ ऑनर’
संदीप देशपांडे, संतोष धुरी विरोधात गुन्हा दाखल
राणा दाम्पत्याला अटी- शर्तींसह जामीन मंजूर
नितेश राणेंच्या निशाण्यावर पुन्हा रझा अकादमी, पीएफआय
श्री बालाजी पार्टीकल बोर्ड नावाने भावना गवळी यांचा कारखाना आहे. या कारखान्यासाठी राष्ट्रीय सहकार महामंडळाने २९ कोटी रुपयांचे, तर राज्य शासनाने १४ कोटी रुपयांचे अनुदान दिले होते. मात्र, ४३ कोटी रुपयांचे अनुदान घेऊनही गवळी यांनी कारखाना सुरू केला नाही. तर ७ कोटी रुपये मूल्य दाखवून हा कारखाना भावना गवळी यांच्याच दुसऱ्या एका संस्थेला विकण्यात आला. या संपूर्ण आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ईडीकडून चौकशी केली जात आहे. भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी हे प्रकरण चांगलेच लावून धरले होते. भावना गवळी यांच्या पाच संस्थांवर ईडीने काही दिवसांपूर्वी धाडी टाकल्या होत्या.