मेट्रोचा बट्याबोळ करूनही मुख्यमंत्र्यांकडून ट्रायल रनची नौटंकी

मेट्रोचा बट्याबोळ करूनही मुख्यमंत्र्यांकडून ट्रायल रनची नौटंकी

आमदार अतुल भातखळकर यांचे तीव्र आंदोलन आणि घणाघाती आरोप

अहंकार आणि बालहट्टापायी लाखो मुंबईकरांचे स्वप्न असलेल्या मुंबई मेट्रोचा बट्याबोळ करून फुकटचे श्रेय घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे धडपडत असल्याचा घणाघाती आरोप करत त्यांच्याविरुद्ध भाजपा नेते आमदार अतुल भातखळकर यांच्या नेतृत्वाखाली आकुर्ली येथे आंदोलन करण्यात आले. त्यावेळी आमदार भातखळकर आणि भाजपा कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. मुख्यमंत्र्यांच्या या चमकोगिरीचा निषेध आंदोलनात करण्यात आला. मेट्रोच्या डहाणूकरवाडी ते आरे स्थानक या दरम्यानच्या मार्गिकांच्या चाचणीचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. त्यांच्या या कार्यक्रमाला विरोध करण्यासाठी हे आंदोलन छेडण्यात आले.

हे ही वाचा:

ओबीसी आरक्षणाचा मुडदा पडत होता आणि मंत्री मोर्चे काढत होते

महाराष्ट्रात कोरोनाची तिसरी लाट?

दहा दिवसांत कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने घट

बस रिकाम्या, पण रांगेत गर्दी

आमदार भातखळकर आणि आंदोलनकर्त्यांनी इथे जोरदार निदर्शने केली. त्यावेळी बोलताना भातखळकर म्हणाले की, मुख्यमंत्री कोणत्या अधिकाराने चमकोगिरी करत आहेत. हा प्रकल्प रखडवल्याबद्दल खरे तर त्यांनी मुंबईकरांची माफी मागायला हवी. पण ते कोरोनाच्या काळात न केलेल्या कामाची जाहिरातबाजी करत आहेत. मेट्रोच्या कामाचा मुख्यमंत्र्यांनी खेळखंडोबा केला आहे, त्यामुळे त्यांना या ट्रायल रनचे उद्घाटन कऱण्याचा नैतिक अधिकार नाही.

प्रसारमाध्यमांसमोर बोलताना भातखळकर म्हणाले की, मेट्रोच्या कामाची बर्बादी केल्याच्या निषेधार्थ आम्ही आंदोलन करत आहोत. अंधेरीचे काम अद्याप झालेले नाही, अजून खांब उभारलेले नाहीत. एकीकडे कोरोनामुळे राज्यात शवांचे ढीग रचले जात आहेत, कोरोनाचे पॅकेज न दिल्यामुळे जनता मरते आहे, उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे फिरकत नाहीत, तरी या नाटकीपणावर करोडो खर्च केले जात आहेत, या सगळ्याचा आम्ही निषेध करत आहोत.

भातखळकर पुढे म्हणाले की,  राज्याचे मुख्यमंत्री हे विरोधी पक्षनेत्यांच्या पत्राला उत्तरही देत नाहीत. आम्ही आपले सामान्य आमदार ५२ हजार मतांनी निवडून आलो आहोत, आम्ही मुख्यमंत्र्यांप्रमाणे विधान परिषदेतून निवडून आलेलो नाही. त्यामुळे आम्हाला कमी ज्ञान असेल. मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा करणे व्यर्थ आहे. यात श्रेयाचा मुद्दा नाही. श्रेय तुम्ही घ्या पण मुंबईकरांची मेट्रो होऊ द्या. अहंकारापायी आरे शेडमधील काम थांबवू नका, असेच आमचे म्हणणे होते. त्यामुळे श्रेयाचा मुद्दा महत्त्वाचा नाही. मेट्रोचा खेळखंडोबा करू नका, असेच आमचे म्हणणे आहे. कोविडचे दिवस असल्यामुळे नियमात राहून आंदोलन करत आहोत. जनतेपर्यंत आम्ही हे मुद्दे पोहोचविण्याचे काम करत आहोत.

Exit mobile version