भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी विचारला सवाल
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध राज्यातील मुख्यमंत्र्यांची एक बैठक कोरोनासंदर्भात गुरुवारी बोलावली होती, पण त्याला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अनुपस्थित होते. पण शुक्रवारी झालेल्या मुंबई महानगरपालिकेच्या एका ऍपच्या उद्घाटनासाठी मात्र मुख्यमंत्री ऑनलाइन हजर होते. त्यावरून मुख्यमंत्र्यांवर टीका केली जात आहे.
भाजपा नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी म्हटले आहे की, प्रकृतीच्या कारणास्तव पंतप्रधानांनी बोलावलेल्या महत्त्वाच्या बैठकीला दांडी मारणारे मुख्यमंत्री आज मात्र मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्रमात उपस्थित राहतात. निवडणुका जवळ आल्या आहेत. त्यामुळे आम्ही केलेल्या टीकेनंतर दिलेल्या वचनांची आठवण येते आहे. ८० हजार कोटींची डिपॉझिट असलेल्या मुंबई महानगरपालिकेने कोरोना काळात एका दमडीचीही मदत लोकांना केली नाही. त्यांनी हे लक्षात ठेवावे की जनता येणाऱ्या निवडणुकीत त्यांना चोख उत्तर देईल.
व्हॉट्सऍप चॅट बॉट या सुविधेचे लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाइन झाले. त्यावेळी मुख्यमंत्र्यांसह पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, पालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल उपस्थित होते. ८० वेगवेगळ्या सुविधांची माहिती या ऍपच्या माध्यमातून लोकांना मिळणार आहे.
या बैठकीला मुख्यमंत्री उपस्थित राहिले पण पंतप्रधानांच्या बैठकीला मात्र ते गैरहजर होते. प्रकृतीच्या कारणामुळे ते उपस्थित राहणार नसल्याने आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे या बैठकीला उपस्थित होते. त्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे टीकेचे लक्ष्य बनले आहेत.
हे ही वाचा:
चित्रपट दिग्दर्शक अली अकबर पत्नीसह झाले हिंदू
राजधानी दिल्लीच्या बाजारात सापडला बॉम्ब
अयोध्येत योगी आदित्यनाथ यांच्या विरोधात उभी राहणार शिवसेना
१२ तासांत मुख्यमंत्र्यांची तब्येत कशी काय ठीक झाली?
याबाबत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनीही मुख्यमंत्र्यांवर टीका केली. ते म्हणाले की, एका ऍपच्या उद्घाटनाला मुख्यमंत्री उपस्थित राहतात. १५ तासांत कशी काय तब्येत ठीक होते. प्रकृती ठीक नाही आम्ही समजू शकतो. महाराष्ट्राला केंद्राकडून आवश्यक त्या गोष्टी मिळाव्यात यासाठी राज्याने ती संधी साधली पाहिजे. पण राज्य सरकारने केंद्रावर टीका करण्यात दोन वर्षे काढली. पण दुर्दैव हे की, तिरस्काराच्या भूमिकेतून बैठकीला मुख्यमंत्री उपस्थित राहिले नसावेत. छोट्या ऍपच्या उद्घाटनाला मुख्यमंत्री उपस्थित राहतात, १०-१२ तासात काय झालं की प्रकृती ठणठणीत होते. आमचा अहंकार, आमची प्रतिष्ठा यापेक्षा राज्य मोठे नाही, पंतप्रधान मोठे नाहीत. हेच मुख्यमंत्र्यांच्या या कृतीतून दिसले.