रेमडेसिवीरचा महाराष्ट्राला सर्वाधिक कोटा, पण ठाकरे सरकारचे रडगाणे सुरूच!

रेमडेसिवीरचा महाराष्ट्राला सर्वाधिक कोटा, पण ठाकरे सरकारचे रडगाणे सुरूच!

भाजपा नेते अतुल भातखळकरांनी केली पोलखोल

केंद्र सरकारने महाराष्ट्राला किती रेमडेसिवीर इंजेक्शन्स दिली आहेत, याची खातरजमा न करता केंद्र सरकारच्या नावे नेहमीप्रमाणे बोटे मोडणाऱ्या ठाकरे सरकारचे मंत्री व नेत्यांवर भाजपा नेते आमदार अतुल भातखळकर यांनी तोफ डागली आहे.

महाराष्ट्रातील करोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता केंद्र सरकारने महाराष्ट्राला २ लाख ६९ हजार इतक्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा केला आहे. इतर कोणत्याही राज्यापेक्षा ही संख्या कितीतरी जास्त आहे, हे कागदोपत्री भातखळकर यांनी सिद्ध केले आहे. आमदार भातखळकर यांनी ट्विटमध्ये या इंजेक्शन्सचा २१ ते ३० एप्रिल या कालावधीतील पुरवठ्याची यादीच टाकली आहे आणि त्यात म्हटले आहे की, ‘देशभरात मोदी सरकारने रेमडेसिवीरचा जो पुरवठा केला आहे, त्याचा ताजा चार्ट पाहा. महाराष्ट्राला दिलेल्या कोट्याच्या आसपास एकही राज्य नाही.’

या यादीत स्पष्टपणे दिसते आहे की, महाराष्ट्राला २१ ते ३० एप्रिल या कालावधीसाठी २ लाख ६९ हजार २१८ इंजेक्शन्स दिली जाणार आहेत. त्यात इतर राज्यांची तुलना केली तर महाराष्ट्रालाच सर्वाधिक प्रमाणात इंजेक्शन्सचा पुरवठा केंद्राकडून होत आहे. मात्र असे असतानाही ठाकरे सरकारमधील मंत्री आणि नेते रडगाणे गात आहेत.

शिवाय, ठाकरे सरकारमधील मंत्र्यांकडून या इंजेक्शनबाबत केल्या जाणाऱ्या मागणीचाही समाचार घेतला आहे. त्यासंदर्भात ट्विट करत भातखळकर यांनी म्हटले आहे की, ठाकरे सरकारचे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणतात की, महाराष्ट्राला दररोज ५० हजार रेमडेसिवीर हवेत, तर जितेंद्र आव्हाड म्हणतात ७० हजार हवेत आणि बोरूबहाद्दर संजय राऊत म्हणतात ८० हजार हवेत. मनाला येईल ते प्रत्येकजण बोलतोय. अहो, बोलण्यापूर्वी एकदा ठरवा तर की कोणता आकडा सांगायचा आहे ते.

मोदी सरकारने तातडीने हालचाल करून महाराष्ट्राला रेमडेसिवीरचा देशातील सर्वाधिक कोटा दिल्याबद्दलही भातखळकर यांनी केंद्र सरकारचे आभार मानले आहेत.

 

Exit mobile version