अतुल भातखळकरांचा घणाघाती आरोप
मुंबईत सुरू असलेल्या लसीकरणातील गोंधळ हा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या आशीर्वादाने सुरू आहे. मुंबई महानगरपालिकेकडून सुरू असलेल्या लसीकरणात प्रचंड गोंधळ सुरू असून त्याला आदित्य ठाकरे जबाबदार आहेत, असा घणाघाती आरोप भाजपा नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी पत्रकार परिषदेत केला.
मुंबई महानगरपालिकेच्या लसीकरणात प्रचंड गोंधळ सुरू असून वशिल्याच्या जोरावर लशी दिल्या जात असल्याची जोरदार चर्चा आहे. १८ ते ४५ वयोगटातील लोकांचे लसीकरण बंद झाले असले तरी कोरोना योद्धे म्हणून वेगवेगळ्या क्षेत्रातील बड्या मंडळींचे, अभिनेत्यांचे व अभिनेत्यांशी संबंधित व्यक्तींचे बिनबोभाट लसीकरण सुरू आहे, असा आरोप भातखळकर यांनी केला. लसीकरणातील हे गैरप्रकार थांबले नाहीत, तर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडे तक्रार करू, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
हे ही वाचा:
मनसुखची हत्या करण्यात आलेली कार जप्त ?
आमदार भातखळकर यांनी या पत्रकार परिषदेत असे सांगितले की, नुकत्याच झालेल्या चक्रीवादळामुळे मुंबईत मोठे नुकसान झाले. अनेक ठिकाणी झोपड्यांचे पत्रे उडून गेले. त्यामुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून महापालिका व राज्य सरकारने संबंधितांना नुकसानभरपाई द्यावी.
महापालिकेतील सत्ताधाऱ्यांकडून होणारे नालेसफाईचे दावे खोटे आहेत, हे सिद्ध झाले. साचलेल्या पाण्याचा निचरा होण्यासाठी ७-८ तास लागले. मोठ्या रस्त्यांवर अनेक झाडे पडली. वर्दळीच्या रस्त्यांवरील झाडे हटविण्यात आली पण छोट्या रस्त्यावरील, सोसायट्यांच्या भिंतींवरील झाडे हटविली गेलेली नाहीत. झाड पडून २ मृत्यूही झाले आहेत. याला महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनाच जबाबदार आहे, अशी टीकाही भातखळकर यांनी यावेळी केली.
महापालिकेच्या झाडे कापणीच्या कंत्राटाची मुदत मार्चमध्ये संपली आहे. कंत्राट महापालिकेत ज्यांनी अडकवून ठेवले त्यांची चौकशी करा व त्यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणीही त्यांनी केली.
आरेतील मेट्रो कारशेडचा विचका करणारे पर्यावरणवादी (म्हणजेच SRA वादी किंवा बिल्डरवादी) आदित्य ठाकरे लसीकरणातील गोंधळालाही जबाबदार आहेत, असे ट्विटही आमदार अतुल भातखळकर यांनी केले आहे.