विधानसभा निवडणुकीसाठीचे मतदान अवघ्या काही दिवसांवर आलेले असताना आता सर्वच पक्षांकडून जोरदार प्रचाराला सुरुवात झाली आहे. यापूर्वी जागा वाटपावरून राज्यात काही पक्षांमध्ये वाद झाल्याचे समोर आले होते. महाविकास आघाडीमधील जागा वाटपावरील नाराजीनाट्य जाहीरपणे समोर आले होते. विशेषतः ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यात जबरदस्त संघर्ष पाहायला मिळाला होता. यानंतर उमेदवारांची घोषणा झाल्यानंतर आणि प्रचाराला सुरुवात झाल्यानंतर जागा वाटपाचा तिढा सुटला असं वाटत असतानाही या दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये मात्र अजूनही नाराजी असल्याचे समोर आले आहे.
ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी त्यांच्या मनातील खदखद माध्यमांसमोर बोलून दाखवत काँग्रेसवर निशाणा साधला आहे. विदर्भातील वाट्याला आलेल्या कमी जागा आणि काँग्रेस नेत्यांची बंडखोरी यावर भास्कर जाधव यांनी नाराजी व्यक्त केली आहे. काँग्रेस नेते आणि जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक यांनी बंडखोरी केली असून यावरून भास्कर जाधव यांनी त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी काँग्रेसकडे केली आहे.
हे ही वाचा:
‘राहुल गांधी लाल पुस्तकाला संविधान म्हणून संबोधतात पण त्यातील पाने मात्र कोरी’
पवारांची यादी अकबरला मिळाली, अमरच्या यादीचे काय?
डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाने सेन्सेक्स १००० अंकांनी वधारला
भास्कर जाधव म्हणाले की, “पूर्व विदर्भात २८ जागा आहेत. या २८ जागांपैकी १४ जागा या २०१९ साली शिवसेना- भाजपाच्या युतीने जिंकल्या होत्या. त्यामुळे २०२४ मध्ये त्यातील किमान आठ ते १० जागा आम्हाला मिळतील असा आमचा अंदाज होता. तसे प्रयत्नही केले गेले. परंतु, २८ जागांपैकी केवळ एक जागा आमच्या वाट्याला आली. त्याही जागेवर काँग्रेसने बंडखोरी करावी. काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांनी बंडखोरी करावी. यावर आज पर्यंत काँग्रेसने त्यांच्यावर कुठलीही कारवाई करू नये याच्यासारखे वेदनादायी प्रकरण कुठले नाही,” अशी खदखद बोलून दाखवत भास्कर जाधव यांनी काँग्रेसवर टीका केली आहे.