भास्कर जाधव म्हणाले, काँग्रेसचे सुनील केदार म्हणजे मारुतीच्या बेंबीतला विंचू!

बंडखोर उमेदवाराचा प्रचार करणाऱ्या सुनील केदार यांच्यावर ठाकरे गटाचे भास्कर जाधवांची टीका

भास्कर जाधव म्हणाले, काँग्रेसचे सुनील केदार म्हणजे मारुतीच्या बेंबीतला विंचू!

राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचारसभांना वेग आलेला असताना आता अवघे काही दिवस मतदानाला राहिले आहेत. तरीही महाविकास आघाडीमधील धुसपूस अजूनही थांबलेली नाही. जागा वाटपावरून सुरू झालेला कलह अजूनही शमलेला नाही, असे चित्र समोर आले आहे. ठाकरे गटाचे भास्कर जाधव यांनी काँग्रेसचे नेते सुनील केदार यांना सुनावले असून विदर्भात काँग्रेस ठाकरे गटाला मदत करत नसल्याची नाराजी बोलून दाखवली आहे. ठाकरे गट विदर्भात २७ जागांवर मदत करत आहे. पण, काँग्रेस आमच्या एका जागेवर गद्दारी करते, असे म्हणत भास्कर जाधवांनी टीका केली आहे.

भास्कर जाधव यांनी सुनील केदार यांना सुनावत म्हटले आहे की, “दुसऱ्याच्या काठीने विंचू मारावा एवढी शिवसेना कमकुवत झालेली नाही. सुनील केदार यांनी रामटेकमध्ये गद्दारी केली हे स्पष्ट आहे. मारूतीच्या बेंबीत लपलेला विंचू म्हणेज सुनील केदार आहेत,” अशा शब्दात भास्कर जाधव यांनी सुनील केदार यांच्यावर टीका केली आहे.

“माझ्याकडे पूर्व विदर्भातील २८ जागांचे कार्यक्षेत्र आहे. त्या २८ जागांपैकी फक्त एक जागा आम्हाला मिळाली आहे. तिथेही काँग्रेसने त्यांचा बंडखोर उमेदवार उभा केला आहे. त्याच्या व्यासपीठावर तुम्ही जाता ही गद्दारी नाही का? तुम्ही उद्धव ठाकरेंना काय मदत करता आहात?” असे संतप्त सवाल भास्कर जाधवांनी उपस्थित केले आहेत.

“सुनील केदार हे मारुतीच्या बेंबीत बसलेले विंचू आहेत हे शिवसेनेने वेळीच ओळखावं. आज मारुतीच्या बेंबीत बोट घातल्यानंतर गार गार लागत असेल पण बाहेर आल्यानंतर प्रत्येकजण बोंबलत येतो कारण आत विंचू बसलेला असतो. तो नांगी मारतो. सुनील केदार हे मारुतीच्या बेंबीत बसलेले विंचू आहेत. इतका विश्वासघात कुठल्याही मित्रपक्षाने आघाडीत करू नये,” अशी टीका भास्कर जाधव यांनी केली आहे.

हे ही वाचा : 

मालेगाव व्होट जिहाद फंडिंग प्रकरणातील मुख्य सूत्रधार सिराज मोहम्मद संबंधी ईडीकडून छापेमारी

एनआयएकडून गैर-स्थानिकांच्या हत्येमधील दहशतवाद्याची मालमत्ता जप्त

‘व्होट जिहाद’चा पर्दाफार्श: मालेगावच्या बँकेत १२५ कोटींचे व्यवहार; दोघांच्या आवळल्या मुसक्या

राजस्थान: मतदान अधिकाऱ्याला मारहाण करणाऱ्या उमेदवाराच्या कार्यकर्त्यांकडून राडा; ६० जणांना अटक

रामटेक मतदारसंघात महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाचे विशाल बरबटे हे अधिकृत उमेदवार आहेत. मात्र या मतदारसंघात काँग्रेसचे माजी मंत्री राजेंद्र मुळक यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यात काँग्रेस खासदार श्यामकुमार बर्वे, माजी मंत्री सुनील केदार हे जाहीरपणे त्यांचा प्रचार करताना दिसत आहेत. त्यामुळे मविआतील धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. काँग्रेसने राजेंद्र मुळक यांच्यावर कारवाई केली आहे. मात्र, तरीही स्थानिक नेते महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार न करता बंडखोराला साथ देत असल्याचे चित्र पुढे आल्याने ठाकरे गटाने संताप व्यक्त केला आहे.

Exit mobile version