पंतप्रधान मोदींचा अपमान केल्या प्रकरणी भास्कर जाधवांचा बिनशर्त माफीनामा

पंतप्रधान मोदींचा अपमान केल्या प्रकरणी भास्कर जाधवांचा बिनशर्त माफीनामा

शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी आज विधिमंडळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नक्कल केल्याबद्दल सभागृहाची बिनशर्त माफी मागितली आहे. मी कोणताही असंसदीय शब्द वापरला नाही, तरी देखील सभागृहाच्या भावना दुखावल्या असतील तर मी बिनशर्त माफी मागतो असे भास्कर जाधव यांनी म्हटले आहे.

बुधवार, २२ डिसेंबर रोजी महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सभागृहाचे वातावरण चांगलेच तापलेले पाहायला मिळाले. शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अंगविक्षेप करत नक्कल केल्यामुळे विरोधी पक्ष त्यांच्या विरोधात चांगलाच आक्रमक झाला होता.

कोणत्याही पक्षाच्या नेत्यांचा अपमान करायची सभागृहाची संस्कृती नसताना भास्कर जाधव यांनी थेट देशाच्या पंतप्रधानांचा अपमान करण्याचे कृत्य सभागृहात केले. त्यामुळे जाधव यांनी माफी मागावी अशी मागणी विरोधकांनी लावून धरली होती.

हे ही वाचा:

भास्कर जाधव यांनी नौटंकीनंतर अंगविक्षेप मागे घेतले!

हिवाळी अधिवेशनात विधानसभेला मिळणार नवे अध्यक्ष महोदय?

‘ठाकरे सरकारचा धिक्कार असो’…विधिमंडळाच्या पायऱ्यांवरून विरोधकांचे आंदोलन

ठाकरे सरकार विरोधात अभाविप आक्रमक! मुंबई विद्यापीठाबाहेर आंदोलन

तर आपण कोणतीही असंसदीय शब्द वापरले नाहीत असे सांगत माफी मागणार नसल्याचा हेका भास्कर जाधव दाखवत होते. सुरुवातीला आपण आपले शब्द आणि अंगविक्षेप मागे घेतो असे भास्कर जाधव म्हणाले. पण तरीदेखील विरोधी पक्ष माफीच्या मागणीवर ठाम होता. या दरम्यान विधिमंडळाचे कामकाज काही काळासाठी स्थगित करण्यात आले. तर कामकाज पुन्हा सुरू झाल्यावर भास्कर जाधव यांनी सभागृहाची माफी मागितली.

मी कोणतेही असंसदीय शब्द वापरले नाहीत. पण मी अंगविक्षेप केले, नक्कल केली यावर विरोधी पक्षाने आक्षेप घेतला आहे आणि माफी मागावी अशी मागणी केली आहे. माफी मागितल्याने कोणीही लहान होत नाही. तेव्हा जर माझ्याकडून सभागृहाचा अपमान झाला असेल तर मी बिनशर्त माफी मागत आहे असे म्हणत भास्कर जाधव यांनी माफीनामा सादर केला.

Exit mobile version