राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसच्या भारत जोडो न्याय यात्रेचा प्रारंभ रविवारपासून हिंसाचारग्रस्त मणिपूरमधून होत आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी बेरोजगारी, महागाई आणि सामाजिक न्याय यांसारख्या मुद्द्यांवर लोकांचे लक्ष केंद्रित करण्याचा पक्षाचा हा प्रयत्न मानला जात आहे.
मणिपूरच्या थौबल जिल्ह्यापासून सुरू होणारी भारत जोडो न्याय यात्रा १५ राज्यांतील १०० लोकसभा मतदारसंघांमधून जाईल. मणिपूर सरकारने काँग्रेसला मर्यादित लोकांसह पॅलेस मैदानातून यात्रा सुरू करण्यास हिरवा झेंडा दाखवला आहे. काँग्रेसकडून सुरुवातीला इम्फाळमधून यात्रेला प्रारंभ केला जाणार होता, मात्र त्यासाठी परवानगी मिळाली नाही. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह पक्षाचे प्रमुख नेते थौबलमध्ये उपस्थित राहतील. पक्षाचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी स्पष्ट केले की, राहुल रविवारी सकाळी ११ वाजता इम्फाळ पोहोचतील आणि पहिल्यांदा खोंगजोम युद्ध स्मारकात जातील.
‘यात्रेदरम्यान राहुल गांधी विविध स्वयंसेवी संस्थांच्या भेटी आणि सभा घेतील. काँग्रेस पक्षाच्या मनात काय आहे, हे राहुल लोकांमध्ये जाऊन सांगतील. ही एका राजकीय पक्षाची यात्रा आहे. ही वैचारिक यात्रा आहे, निवडणूक यात्रा नव्हे. आपण सर्वांत मोठी लोकशाही आहोत, असे आपण सांगतो, मात्र खरे म्हणजे आज लोकशाही कमी झाली आहे आणि एकाधिकारशाही वाढली आहे,’ असे पक्षाचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी स्पष्ट केले.
हे ही वाचा:
५५ वर्षांचे संबंध संपवत मिलिंद देवरांची काँग्रेसला सोडचिठ्ठी
चीनपासून देशाचे संरक्षण करण्यासाठी कटिबद्ध
देशातील बहुतांश मुस्लिम अयोध्येतील राम मंदिराच्या बाजूने
मालदीवच्या अध्यक्षांनी तोडले अकलेचे तारे!
सहा हजार ७१३ किमी होणार यात्रा
भारत जोडो न्याय यात्रा सहा हजार ७१३ किमीचे अंतर पायी आणि बसने कापणार आहे. ६६ दिवसांमध्ये यात्रा ११० जिल्हे, १०० लोकसभा मतदारसंघ आणि ३३७ विधानसभा मतदारसंघांतून जाऊन २१ किंवा २१ मार्च रोजी मुंबईमध्ये तिचा समारोप होईल.