ईडीच्या पथकाने भाई ठाकूर कुटुंबियांच्या विवा गृपवर आज कारवाईचा फास आवळला. सकाळपासून वसई-विरार आणि मीरा भायंदरमधील विवा समुहाच्या सहा ठिकाणांवर ईडीच्या पथकाने छापे टाकले. या छाप्यांमध्ये एचडीआयएल आणि विवा समुहाचे सुमारे चारशे कोटींचे आर्थिक व्यवहार उघड झाल्याचे समजते.
पीएमसी घोटाळ्यात सामील असल्यामुळे एचडीआयएल गृपवर ईडीने फास आवळला. त्याचे धागेदोरे विवा समुहापर्यंत पोहोचले आहेत. एचडीआयअलचे सर्वात मोठे ले-आऊट वसई विरारमध्ये असून त्यांच्यासाठी जमीन ताब्यात घेण्यासाठी एचडीआयअलने १९९१ पासून भाई ठाकूरची मदत घ्यायला सुरूवात केली. हे समीकरण इतके घट्ट होते की वरडाई चांदी प्रकरणी भाई ठाकूर तुरुंगात गेल्यानंतरही ते कायम राहीले, किंबहुना घट्ट झाले. मुंबईत मोठी कामे करणारे बडे बिल्डर वसई-विरारमध्ये ठाकूर कंपनीच्या दहशतीमुळे काढता पाय घेत असताना एचडीआयएलने मात्र इथे कामाचा धडाका लावला होता. दोन्ही कंपन्यांमध्ये गेल्या तीस वर्षात शेकडो कोटी रुपयांची देवाणघेवाण झाल्याची शक्यता आहे. एचडीआयएलमुळे विवाचे वसई-विरारमधील साम्राज्य बळकट झाले. आज एचडीआयअलमुळे ठाकूर कंपनी गोत्यात आली आहे.
ईडीच्या कारवाईत विवा समुह आणि एचडीआयअल यांचे गेल्या तीन दशकांतले व्यवहार उघड झाले आहेत. हा आकडा सुमारे चारशे कोटींचा आहे असे मानले जाते.
ED conducts searches on premises of Hitendra Thakur owned Viva group, in Mumbai in connection with Yes Bank & PMC Bank Scam. ED has traced money trail b/w Pravin Raut & Thakur family: ED Officials
Raids underway in Mira Bhayandar, Vasai-Virar; around 6 premises being raided pic.twitter.com/WzbKJpGjFJ
— ANI (@ANI) January 22, 2021
या कारवाईत वसई-विरारच्या अन्य बिल्डरचे विवा समुहाशी असलेले संशयास्पद आर्थिक व्यवहार उघड झाले आहेत. या बाबत ईडीला भक्कम पुरावे मिळाले आहेत. यातून काळा पैसा आणि हवालाचा प्रचंड मोठा व्यवहार उघड होण्याची चिन्ह आहेत.
एचडीआयअल आणि विवा समुहाचे समीकरण घट्ट होण्यामागे प्रवीण राऊत यांची महत्वाची भूमिका होती. पीएमसी घोटाळा प्रकरणी ईडीने प्रवीण राऊत याची चौकशी केल्यानंतर विवा समुहाशी संबंधित बराच तपशील उघड झाला, त्याच आधारावर ईडीने विवा समुहावर ही कारवाई केल्याचे समजते.