सरकारची वृत्ती ‘गरज सरो वैद्य मरो’ अशीच

कोविड काळात मुंबईकरांच्या सोयीसाठी जीवावर उदार होऊन सेवा देणाऱ्या बेस्ट कर्मचाऱ्यांना ठाकरे सरकारने मंजूर केलेला विशेष भत्ता अजून पर्यंत दिलेला नाही. जुलै ते डिसेंबर २०२० या काळातील सेवेबद्दलचा हा भत्ता न देण्यावरून भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी सरकारवर 'गरज सरो वैद्य मरो' अशी वृत्ती असल्याची सडकून टीका केली आहे.

सरकारची वृत्ती ‘गरज सरो वैद्य मरो’ अशीच

बेस्ट कर्मचारी विशेष भत्त्याच्या प्रतिक्षेत

कोविड काळातही आपले प्राण धोक्यात घालून कर्तव्यवार हजर राहिलेल्या बेस्ट उपक्रमातील कर्मचाऱ्यांना गेले सहा महिने विशेष भत्ता मिळालेला नाही. जुलै ते डिसेंबर २०२० या कालावधीतील हा भत्ता या कर्मचाऱ्यांना अजूनही देण्यात आलेला नाही. यामुळे बेस्ट कर्मचाऱ्यांत तीव्र नाराजी पसरली आहे. सरकारच्या या ढिसाळ धोरणावरून भाजपाचे नेते आमदार अतुल भातखळकर यांनी पुन्हा एकदा सरकारवर टीका केली आहे.

मार्च २०२० मध्ये कोविडचा प्रसार वाढल्यानंतर टाळेबंदी जाहिर झाली होती. तरीही काही या काळात अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना कामावर हजर राहणे भाग होते. अशा वेळेस बेस्ट या कर्मचाऱ्यांच्या मदतीला धावून आली. या काळात लोकांना सेवा देण्यसाठी बेस्टचे अनेक कर्मचारी जीवावर उदार होऊन कर्तव्यावर राहिले होते. यामुळे कित्येकांना कोरोनाची लागण झाली, तर काहींचे यात प्राण देखील गेले.

हे ही वाचा:

जाणत्या-अजाणत्यांचे बार बार देखो

कोविड पाठोपाठ बळावतोय आणखी एका आजाराचा धोका

दिल्लीत १०५ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स काळ्याबाजारातून जप्त

कोविड रुग्णांना भारतीय बनावटीच्या ‘वायुपुत्रा’ची साथ

या वेळी कर्तव्यावर उपस्थित राहिल्यास, कर्मचाऱ्यांसाठी दररोज तीनशे रुपये विशेष भत्ता मंजूर झाला. परंतु बेस्टच्या सर्व कर्मचाऱ्यांना केवळ जूनपर्यंतच हा भत्ता मिळाला होता. त्यानंतर हा भत्ता बंद झाला होता. त्यामुळे जुलैपासून ते डिसेंबर २०२० पर्यंतच्या भत्त्याच्या प्रतिक्षेत बेस्टचे हे कर्मचारी आहेत. यांमध्ये चालक, वाहकांसह विद्युत, अभियंता विभागातील शेकडो कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

सरकारच्या या ढिसाळपणावरून भाजपाचे नेते आमदार अतुल भातखळकर यांनी सरकारला लक्ष्य केले आहे. त्यांनी ट्वीटरवरून सरकरावर निशाणा साधला आहे. या ट्वीट मध्ये त्यांनी सरकारच्या या वृत्तीला गरज सरो वैद्य मरो वृत्ती असल्याचे म्हटले आहे. ते ट्वीटमध्ये म्हणतात,

गेल्यावर्षी ऐन लॉकडाऊनच्या काळात जीवावर उदार होऊन मुंबईतील सार्वजनिक वाहतूक सुरू ठेवणाऱ्या बेस्ट कर्मचाऱ्यांना कबूल केलेला जुलै ते डिसेंबर २०२० कालावधीचा विशेष भत्ता स्वघोषित बेस्ट मुख्यमंत्र्यांच्या सत्ताधारी शिवसेनेने अजूनही दिलेला नाही. गरज सरो वैद्य मरो अशी ही वृत्ती.

Exit mobile version