“भाजपाच्या डीएनए मध्ये बंगालचे सूत्र” – नरेंद्र मोदी

“भाजपाच्या डीएनए मध्ये बंगालचे सूत्र” – नरेंद्र मोदी

भारतीय जनता पार्टीने आपल्या ‘मिशन बंगाल’ साठी आक्रमक प्रचार सुरु केला आहे. रविवारी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची न भूतो न भविष्यती अशी सभा झाली. कलकत्त्याच्या ब्रिगेड परेड मैदानात झालेल्या या प्रचारसभेला ‘रेकॉर्ड ब्रेक’ गर्दी झाली. बंगाल निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर मोदींची ही पहिलीच सभा होती. आपल्या भाषणातून मोदींनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला.

“आम्हाला फक्त बंगालची सत्ता बदलायची नाहीये तर आम्हाला बंगालचे राजकारण बदलून ते विकास केंद्रित करायचे आहे. म्हणूनच ‘असोल पोरीबर्तन’ चा नारा आम्ही देतोय. मी इथे ‘असोल पोरीबर्तन’ मध्ये तुमचा विश्वास निर्माण करायला आलेलो आहे. बंगालची परिस्थिती बदलू शकते, बंगालचा विकास होऊ शकतो हा विश्वास निर्माण करायला आलोय. पुढची २५ वर्ष बंगालच्या विकासासाठी महत्वाची ठरणार आहेत. २०४७ साली जेव्हा भारत आपल्या स्वातंत्र्याची शंभर वर्ष पूर्ण करेल तेव्हा पुन्हा एकदा बंगाल भारताचे नेतृत्व करत असेल.” असे मोदी आपल्या भाषणात म्हणाले.

“दीदी काही दिवसांपूर्वी तुम्ही स्कुटी चालवत होतात. तुम्हाला लागू नये अशी सगळ्यांचीच इच्छा होती. तुम्ही पडला नाहीत हे चांगलेच झाले. पण आता तुमच्या स्कुटीने भवानीपूर ऐवजी नंदिग्रामचा रस्ता पकडला आहे. आता स्कुटीला नंदीग्राम मध्ये येऊन पडायचेच असेल तर त्याला मी काय करू शकतो?” असे म्हणत मोदींनी ममता बॅनर्जींची फिरकी घेतली.

“त्यांनी (ममता बॅनर्जींनी) ‘माँ, माती, मानुष’ साठी काम करायचे वचन दिले होते. पण गेल्या दहा वर्षांत सामान्य माणसाच्या जीवनात बदल घडवुन आणण्यात तृणमूलला यश मिळाले का?” असा सवाल मोदींनी केला.

“बंगाल मधल्या ‘माँ, माती, मानुष’ ची परिस्थिती तुम्हाला माहित आहेच. मातांवर दिवसाढवळ्या रस्त्यावर आणि घरात हल्ले होत आहेत. काही दिवसांपूर्वीच एका ८० वर्षांच्या मातेवर झालेल्या हल्ल्यातून समोर आलेला क्रूर चेहरा साऱ्या देशाने पाहिला आहे.” असेही मोदी म्हणाले.

हे ही वाचा:

अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांचा भाजपात प्रवेश

“बंगालला ‘शांती’, ‘शोनार बांग्ला’ आणि ‘प्रगतिशील बांग्ला’ ची गरज आहे. ‘शोनार बांग्ला’ चे स्वप्न पूर्ण होईल. आज मी इथे बंगालच्या विकासाची शाश्वती देण्यासाठी आलो आहे. इथली गुंतवणूक वाढवायला, संस्कृती वाचवायला, आणि परिवर्तन घडवायला आलो आहे.” असा विश्वास पंतप्रधान मोदींनी बंगालवासीयांना दिला.

भारतीय जनता पार्टीच्या स्थापनेत बंगालचा विचार आहे. भाजपाच्या डीएनए मध्ये बंगालचे सूत्र आहे असेही मोदी म्हणाले. नरेंद्र मोदींच्या भाषणापूर्वी प्रसिद्ध अभिनेता मिथुन चक्रवर्ती यांनी भाजपामध्ये अधिकृतरित्या प्रवेश केला आहे. पश्चिम बंगालचे भाजपा प्रदेश अध्यक्ष दिलीप घोष यांच्या उपस्थितीत कोलकाता येथील ब्रिगेड परेड ग्राऊंडवर मिथुन चक्रवर्ती यांनी भाजपात प्रवेश केला आहे.

Exit mobile version