महायुती सरकारच्या यंदाच्या हिवाळी अधिवेशनाला गुरुवार, ७ डिसेंबरपासून सुरुवात होत आहे. राज्याची उपराजधानी नागपुरात हे अधिवेशन होत आहे. त्यामुळे आता पुढचे १० दिवस नागपूरमधील राजकीय घडामोडींवर लक्ष असणार आहे. हे अधिवेशन विविध मुद्द्यांवरून गाजण्याची शक्यता आहे. या अधिवेशनात नऊ विधेयक मांडली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. याशिवाय अनेक मुद्द्यांवर अधिवेशनात चर्चा होणार आहे.
राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा प्रश्न पेटला असून विधिमंडळाच्या अधिवेशनातही हा मुद्दा जबरदस्त गाजणार असल्याची शक्यता आहे. विरोधक मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून सरकारला घेरण्याची दाट शक्यता आहे. याशिवाय मराठा आरक्षणासोबतच धनगर आणि आदिवासी आरक्षणाचा प्रश्नही ऐरणीवर आहे. त्यामुळे त्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे.
गेल्या काही दिवसांत राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस पडला. यामुळे शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे नुकसानभरपाई आणि शेतकरी हा मुद्दाही चर्चेत येऊ शकतो. शिवाय सध्या राज्यात गाजणारा मुद्दा म्हणजे ललित पाटील ड्रग्स प्रकरण. मागच्या काही दिवसांपासून नवनवे खुलासे यात होत असून या मुद्द्यावरून आरोपप्रत्यारोप होण्याची शक्यता आहे. तसेच या अधिवेशनात नऊ विधेयकं मांडली जाणार आहेत. ही कोणती विधेयकं असणार आहेत हे पाहणं महत्वाचं असेल.
हे ही वाचा:
दलालाला पद वाटण्याच्या मजबुरीला काय म्हणावे?
पहिला सीमा, नंतर अंजु अन आता पाकिस्तानच्या जवेरिया खानमची चर्चा!
रेवंथ रेड्डींकडे येणार तेलंगणच्या नव्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी
‘प्रणब मुखर्जी म्हणायचे, राहुल गांधी हे अपरिपक्व नेते’
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या आदल्या दिवशी म्हणजे बुधवारी संध्याकाळी सरकारकडून चहापानचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमावर विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकला होता. चहापानानंतर पार पडलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. विरोधकांसाठी आता सुपारी पान ठेवायला हवं, असा टोला त्यांनी लगावला. विरोधकांना विदर्भ मराठवाड्यासाशी काहीही देणं घेणं नाही हे त्यांच्या भूमिकेवरून दिसतं, असं फडणवीस म्हणाले.