राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी एसटी कर्मचाऱ्यांनी आक्रमक आंदोलन केले. या आंदोलनानंतर त्यावर अनेक प्रतिक्रिया समोर येऊ लागल्या आहेत. शरद पवारांनी दिलेले आश्वासन पाळलं नाही, कर्मचाऱ्यांचे आंदोलन दाबण्याचा प्रयत्न केल्याने ही परिस्थिती उद्भवली असल्याची प्रतिक्रिया विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आणि भारतीय जनता पार्टीचे नेते प्रविण दरेकर यांनी दिली आहे.
प्रवीण दरेकर म्हणाले की, एसटी कर्मचारी सध्या लढू किंवा मरू या स्थितीत असल्याने कर्मचारी आक्रमक झाले आहेत. गेल्या पाच महिन्यापासून कर्मचाऱ्यांचे आंदोलन दाबल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे. या सगळ्या परिस्थितीला फक्त महाविकास आघाडी सरकार कारणीभूत असल्याचे दरेकर यांनी म्हटले आहे.
शरद पवार यांनी वेळोवेळी कर्मचाऱ्यांना सरकारमध्ये विलीनीकरण करण्याबाबत आश्वासन दिले होते. मात्र ते आश्वासन पाळलं गेलं नसल्याने एसटी कर्मचारी महाविकास आघाडीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या घरी गेले असल्याचे दरेकर म्हणाले.
शरद पवार यांचे निवासस्थान असलेल्या सिल्वर ओकवर एसटी कर्मचाऱ्यांच्या एका गटाने आक्रमक आंदोलन केले.
हे ही वाचा:
शरद पवारांच्या घरावर एसटी कर्मचाऱ्यांकडून दगडफेक
‘पवार साहेब आता तरी संन्यास घ्या, गप घरी बसा’
राज ठाकरेंना तुरंगात टाका, अबू आझमींची शरद पवारांकडे मागणी
पवार साहेब राणा आयुबचे वकिलपत्र पण स्विकारणार का?
आक्रमक झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांसोबत चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुढाकार घेतला. मात्र, एसटी कर्मचाऱ्यांनी आक्रमक पवित्रा सोडला नाही. यावेळी संपकरी कर्मचाऱ्यांनी शरद पवार यांच्याविरोधात आक्रमक घोषणाबाजी केली. तासभर एसटी कर्मचाऱ्यांनी शरद पवारांच्या निवासाबाहेर आंदोलन केलं. त्यांनतर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे शरद पवार यांच्या भेटीसाठी त्यांच्या निवास्थानी गेले होते.