पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येतून जालना- मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवला. त्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या गाडीतून प्रवास केला. त्यांच्यासोबत केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे हे ही उपस्थित होते. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अयोध्येतील राम मंदिराचे उदघाटन आणि बाबरी पतन या विषयांवर भाष्य केले. बाबरी पतनावेळी शिवसेनेचे कोणतेही नेते उपस्थित नसल्याचा पुनरुच्चार फडणवीस यांनी केला.
“बाबरीचा ढाचा पडला, तेव्हा भाजपाचीच माणसे तिथे होते. जे लोक (ठाकरे गट) तिथे असण्याचा दावा करत आहेत, त्यांच्यापैकी कुणीही उपस्थित नव्हते. तिथल्या मंचावर आडवाणी, मुरली मनोहर जोशी आणि उमा भारती उपस्थित होत्या. त्यामुळे दावा करणारे केवळ वाचाळवीर आहेत, त्यांचा या घटनेशी काहीही संबंध नाही. आम्हाला सांगण्यात आले होते की, कोणत्याही संघटनेने श्रेय घ्यायचे नाही. ढाचा कुणी पाडला असे विचारल्यानंतर कारसेवकांनी पाडला, असे बोलायचे. हे ठरले होते. आम्ही शिस्त पाळणारे कार्यकर्ते आहोत, त्यामुळे आम्ही तसेच उत्तर दिले,” असे स्पष्टीकरण देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
“बाळासाहेबांना जेव्हा विचारण्यात आले की, बाबरी पाडणाऱ्यांमध्ये तुमचे लोक आहेत का? तेव्हा बाळासाहेब इतकेच म्हणाले होते की, ते आमचे लोक असतील तर मला त्याचा अभिमान आहे. हे साधे वाक्य होते. मात्र, जे लोक घराबाहेर पडले नाहीत. त्यांनी बाळासाहेबांच्या त्या वाक्याचा आधार घेऊन श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला,” असा आरोप करत देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली.
“डॉ. फडणवीस वगैरे लोक पिचक्या मांडीवर थाप मारून सांगत आहेत, ‘राममंदिराच्या लढ्यात शिवसेनेचे योगदान काय? हिंमत असेल तर अयोध्येत या, तुमच्या छाताडावर मंदिर उभे केले आहे,” अशी टीका सामना दैनिकाच्या अग्रलेखातून २७ डिसेंबर रोजी करण्यात आली होती. यावरून देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे गटावर निशाणा साधला आहे.
हे ही वाचा:
मराठवाड्याची लेक करणार नव्या जालना- मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचे सारथ्य
जय श्रीराम: अयोध्येत १० वर्षांत ८५ हजार कोटींचा मेकओव्हर होणार
बब्बर खालसा इंटरनॅशनलचा नेता भारताकडून दहशतवादी घोषित
रशियाने युक्रेनवर १२२ क्षेपणास्रं डागली; ३१ नागरिक ठार
देवेंद्र फडणवीस यांनी काही आठवणीही सांगितल्या. ते म्हणाले की, “अयोध्येत २२ जानेवारी रोजी राम मंदिराचे उदघाटन होणार आहे. याचा मला मनस्वी आनंद वाटतो. ज्यावेळेस पहिल्यांदा राम शीला पूजन झाले, तेव्हा माझे वय १८ वर्षांचे होते. पहिल्या कारसेवेच्या वेळी मी स्वतः गेलो होतो. अयोध्येतून रामजन्मभूमीच्या ठिकाणी पायी चालत जात असताना आमच्यावर लाठीचार्ज झाला. बदायू येथील केंद्रीय कारागृहात १७ ते १८ दिवस काढले. त्यानंतर १९९२ साली पुन्हा अयोध्येत गेलो होतो. बाबरीचा ढाचा पाडला, तेव्हाचा आनंद वेगळाच होता. तो शब्दात सांगता येणार नाही. अटलजींच्या काळातही पुन्हा कारसेवा झाली, तेव्हाही आम्ही गेलो होतो,” अशी आठवण फडणवीस यांनी सांगितली.