संसदेचे विशेष अधिवेशन सध्या सुरू असून या अधिवेशनात विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोमवार, १ जुलै रोजी हिंदू धर्मावर वक्तव्य केले. यानंतर मोठा गदारोळ माजला होता. हिंदू हिंसाचार पसरवतात अशा आशयाचे वक्तव्य राहुल गांधी यांनी सभागृहात केले होते. यानंतर सत्ताधारी पक्ष आक्रमक झाला होता. अशातच आता भाजपा खासदार बांसुरी स्वराज यांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहीत कारवाईची मागणी केली आहे.
राहुल गांधी यांनी सोमवारी सभागृहात केलेल्या भाषणावरुन वाद निर्माण झाला आहे. या वादानंतर त्यांच्या भाषणातील अनेक भाग संसदेच्या कामकाजातून हटवण्यात आले आहेत. आता भाजपाच्या दिवंगत नेत्या सुषमा स्वराज यांच्या कन्या आणि पहिल्यांदाच दिल्लीतून खासदार झालेल्या बांसुरी स्वराज यांनी याप्रकरणी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहिले आहे. बांसुरी स्वराज यांनी या पत्रात लिहिले आहे की, राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर चर्चा करताना, काल लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या भाषणातील चुका आणि विसंगतींकडे तुमचे लक्ष वेधून घेऊ इच्छिते. त्यांनी लोकसभा अध्यक्षांकडे राहुल गांधी यांच्यावर नियम ११५ (१) अंतर्गत कारवाई करण्याची मागणी केली आहे.
राहुल गांधी यांनी आपल्या भाषणादरम्यान भगवान शंकराचे चित्र दाखवले आणि शंकराच्या अभय मुद्रेचा उल्लेख करत म्हणाले की, काँग्रेस सध्या अभय मुद्रेमध्ये आहे. यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांवर हिंसाचारात गुंतल्याची टीकाही केली. भगवान शंकराच्या फोटोसह राहुल गांधींनी कुराणचा उल्लेख केला, गुरु नानक आणि येशूंचा फोटोही दाखवला. ते म्हणाले की, कुराणात लिहिले आहे, घाबरू नका. येशू म्हणतात घाबरू नका आणि कुणालाही घाबरवू नका. सर्व धर्मग्रंथांमध्ये अहिंसेचा उल्लेख करण्यात आला आहे. प्रत्येकजण अहिंसेबद्दल, भीती घालवण्याबद्दल बोलले आहेत. आपला देश अहिंसेचा देश आहे. अहिंसा हे हिंदूंचे प्रतीक आहे, पण सध्या सत्तेत असलेले हिंदू नाहीत. स्वतःला हिंदू म्हणवून घेणारेच चोवीस तास हिंसाचार आणि द्वेषात गुंतले आहेत, अशी टीका राहुल गांधी यांनी केली.
हे ही वाचा:
सभागृहात शिवीगाळ करणाऱ्या अंबादास दानवेंचे निलंबन
धर्मांतर होत राहिल्यास देशातील बहुसंख्य लोकसंख्या एक दिवस अल्पसंख्याक होईल
बार्बाडोसमध्ये अडकलेला भारतीय संघ विश्वचषक घेऊन मायदेशी येण्यास सज्ज!
राहुल गांधींच्या आरोपांनंतर नरेंद्र मोदी संतापले, लोकसभेत गोंधळ
राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी गदारोळ सुरू केला. यावेळी स्वतः पीएम मोदी त्यांच्या खुर्चीवरून उठले आणि राहुल यांचे वक्तव्य गंभीर बाब असल्याचे सांगितले. संपूर्ण हिंदू समाजाला हिंसक म्हणणे, ही गंभीर बाब असल्याची टीका पंतप्रधान मोदींनी केली. याशिवाय, गृहमंत्री अमित शाह यांनी राहुल गांधींच्या माफीची मागणी केली.