‘ओवळा-माजिवडाचे आमदार हरवले’…ठाण्यात लागले बॅनर

‘ओवळा-माजिवडाचे आमदार हरवले’…ठाण्यात लागले बॅनर

ठाण्यातील शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक हे सध्या अज्ञातवासात आहेत. गेले अनेक दिवस सरनाईक कुठे आहेत? हे कोणालाच माहीत नसून आता त्यांच्या विरोधात मतदारसंघात बॅनर झळकू लागले आहेत. या बॅनर्सच्या माध्यमातून स्थानिक नागरिकांनी सरनाईक यांच्या विरोधातील आपला आक्रोश व्यक्त केला आहे. ‘ओवळा-माजिवडाचे आमदार हरवले. आपण त्यांना पाहिलंत का?’ असा सवाल या बॅनरच्या माध्यमातून त्यांच्या मतदारसंघातील नागरिकांनी विचारला आहे.

ठाण्यातील ओवळा-माजिवडा मतदारसंघातून निवडून येणारे शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक हे गेल्या काही महिन्यांपासून ‘आऊट ऑफ रिच’ झाले आहेत. सरनाईक हे ईडीच्या रडारवर आल्यापासून ते गायब झाले आहेत. कोविडच्या या कठीण काळात जेव्हा मतदारसंघातील नागरिकांना लोकप्रतिनिधींची आणि त्यांच्या कार्याची प्रकर्षाने आवश्यकता भासत आहे तेव्हा ओवळा-माजिवडा मतदार संघातील नागरिकांसाठी त्यांचे आमदार जागेवर नाहीयेत. त्यामुळे या कठीण काळात आमदार प्रताप सरनाईक यांनी आपल्याला वाऱ्यावर सोडल्याची भावना स्थानिकांमध्ये निर्माण झाली आहे.

हे ही वाचा :

ट्वीटरने कायदेशीर संरक्षण गमावलं, केंद्र सरकारची कारवाई

शिवसेना भवनावर भाजपा युवा मोर्चाचा “फटकार मोर्चा”

मुंबई-पुण्यात ५जी च्या चाचणीला सुरवात

राम मंदिर उभारणीत कोलदांडा घालणाऱ्या शिवसेनेला ‘फटकार’

नागरिकांच्या सहनशक्तीचा अखेर अंत झाला असून नागरिकांनी सरनाईक यांच्या विरोधातच बॅनर लावले आहेत. ओवळा-माजिवडा या मतदारसंघातील विविध भागात लावलेल्या बॅनर्सवरील मजकूरातून नागरिकांची चीड व्यक्त होत आहे. ‘ओवळा-माजिवडा वाऱ्यावर, आमदार कागदावर’, ‘ओवळा-माजिवडाचे आमदार हरवले. आपण त्यांना पाहिलंत का? असा मजकूर या बॅनर्सवर दिसत आहे.

आमदार नक्की कोणासोबत लपाछपी खेळतायत?
प्रताप सरनाईक यांच्या विरोधात लागलेल्या बॅनर्सवरून ठाण्यातील भारतीय जनता पार्टी आक्रमक झाली आहे. सरनाईकांच्या विरोधात लागलेल्या बॅनर्सचे फोटो आपल्या ट्विटर हँडलवर शेअर करत ठाणे भाजपाने सरनाईक यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘ओवळा-माजिवडाचे आमदार तीन महिन्यांपासून गायब…आमदार नक्की कोणासोबत लपाछपी खेळतायत? जनता की अजून कोणी?’ असा खोचक सवाल भाजपाने विचारला आहे.

Exit mobile version