सचिनने आमच्या तालावर नाचावे अशी अपेक्षा!

सचिनने कुस्तीगीरांना पाठिंबा द्यावा अशी मागणी करणारे बॅनर युवक काँग्रेसच्या वतीने लावण्यात आले

सचिनने आमच्या तालावर नाचावे अशी अपेक्षा!

दिल्लीत कुस्तीगीरांचे आंदोलन सुरू आहे. कुस्तीगीर महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह यांच्याविरोधात लैंगिक शोषणाचे आरोप आहेत. त्याविरोधात अनेक राजकीय पक्ष हे कुस्तीगीरांना पाठिंबा देत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर भारताचा मास्टर ब्लास्टर फलंदाज सचिन तेंडुलकर यानेही कुस्तीगीरांबद्दल बोलावे अशी मागणी करणारे एक बॅनर सचिन तेंडुलकरच्या वांद्रे येथील घराबाहेर लावण्यात आले होते. युवक काँग्रेसने हे बॅनर लावून त्यावर काही प्रश्न सचिन तेंडुलकरला विचारले होते.

सचिन या कुस्तीगीरांच्या मुद्द्यावर का बोलत नाही. का मूग गिळून गप्प आहे. त्याच्यावर ईडी, सीबीआयचा दबाव आहे का, त्याने शेतकरी आंदोलनात परदेशी सेलिब्रिटींवर टीका केली होती पण आपल्या देशातील कुस्तीगीरांसाठी तो का बोलत नाही, असे प्रश्न या बॅनरवर उपस्थित करण्यात आले होते. नंतर ते बॅनर हलविण्यात आल्याचे कळते. पण यानिमित्ताने प्रश्न निर्माण झाला की, सचिनने कोणत्या मुद्द्यावर बोलावे, कोणत्या मुद्द्यावर बोलू नये याची सक्ती कुणीही कशी काय करू शकते? सचिनला भूमिका घ्यायची असेल तर तो घेईल अथवा न घेईल.

सचिन तेंडुलकर याने मुळातच कधीही आतापर्यंत राजकीय भूमिका घेतलेली नाही. त्याचे सगळ्याच राजकीय नेत्यांशी चांगले संबंध राहिले आहेत. कुणाच्याही विरोधात किंवा बाजुने त्याने भूमिका घेतलेली नाही. सरकारी योजनेचा दूत म्हणून त्याला संधी दिली गेल्यास त्याने ते स्वीकारलेले आहे. त्यामुळे त्याची एखाद्या पक्षाप्रती आस्था आहे किंवा एखाद्या पक्षाबद्दल विरोध आहे असे समोर आलेले नाही. त्यामुळे त्याने कुस्तीगीरांच्या मुद्द्यावर राजकीय पक्षाच्या विनंतीनुसार बोलावे हे शक्यच नव्हते. तसे पाहिले तर कुस्तीगीरांच्या या आंदोलनाला राजकीय रंग प्राप्त झालेला आहे. त्यात अनेक राजकीय गटतट शिरल्यामुळे त्यात फक्त खेळाडूंवर झालेल्या अन्यायासाठीच आंदोलन होत आहे, हा मुद्दा आता शिल्लक राहिलेला नाही. त्यामुळे कदाचित सचिनने यात कोणतीही भूमिका घेणे टाळलेले आहे.

कारण त्याने जर खेळाडूंना पाठिंबा दिला तर त्याच्यावर साहजिकच विरोधी गटाकडून शेरेबाजी होणार किंवा जर त्याने कुस्तीगीरांच्या विरोधात भूमिका घेतली तर त्यातही त्याला लक्ष्य केले जाणार. म्हणूनच सचिन या संदर्भात कोणतीही प्रतिक्रिया देण्यास धजावत नसावा. तरीही त्याने अमूक प्रकरणात बोललेच पाहिजे, नाही बोलले तर त्याच्यावर कुणाचा तरी दबाव आहे असे बोलणे कितपत योग्य आहे, याचा विचार केला गेला पाहिजे. युवक काँग्रेसने हा आरोप करताना सचिन तेंडुलकरला एकप्रकारे अपमानितच केले. आम्ही म्हणू तशी भूमिका घेतली पाहिजे, नाहीतर आम्ही तुला लक्ष्य करू असाच या मागणीचा अर्थ आहे.

अर्थात सचिनने त्यावरही प्रतिक्रिया दिलेली नाही. याच काँग्रेसने सचिनला २०१३मध्ये त्याची अखेरची कसोटी झाल्यानंतर आणि त्याने त्या कसोटीत निवृत्तीची घोषणा केल्यानंतर त्याला भारतरत्न देण्याची घोषणा केली होती. स्वतः राहुल गांधी हे वानखेडे स्टेडियममध्ये येऊन सचिनला भेटले होते. त्यावेळी सचिनला भारतरत्न हा पुरस्कार जाहीर झाला होता. सचिनला राज्यसभेचे खासदारही करण्यात आले होते. पण म्हणून सचिनने काँग्रेसची भूमिका खांद्यावर घेऊन मिरवावी अशी अपेक्षा नव्हती किंवा सचिनने कधी काँग्रेसच्या बाजुने कोणतेही मत व्यक्त केले नाही.

हे ही वाचा:

हिंदू नावाचा वापर करून त्याने मॉडेलला फसवले, पण द केरळ स्टोरीने दिली तिला प्रेरणा

रेल्वेत मिळाला २ लाखांचा फोन, त्याने विकला ३५०० रुपयांना…

आमदार भातखळकरांच्या प्रयत्नांमुळे कांदिवली स्थानकातला सरकता जिना होणार सुरू

कर्नाटकनंतर आता राजस्थान काँग्रेस सरकारकडून ‘फुकट’ची वीज

अर्थात, त्यामागे काँग्रेसची अपेक्षा असावी की, सचिनच्या मागे तरुणाई आहे, मोठा चाहता वर्ग आहे. त्यामुळे सचिनला पुरस्कार दिल्यानंतर त्यांचा पाठिंबा काँग्रेसला मिळेल. कारण तो सगळा निवडणुकीचाच काळ होता. या सगळ्या पार्श्वभूमीवर सचिनला आपण लक्ष्य करू शकतो असे तर युवक काँग्रेसला वाटले नाही ना? सचिनने यापूर्वी शेतकरी आंदोलनादरम्यान परदेशी सेलिब्रिटींवर शरसंधान केले होते. या परदेशी सेलिब्रिटींनी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शविला होता आणि भारतात शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याची बतावणी केली होती. तेव्हा सचिन तेंडुलकरच नव्हे तर स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांनीही या परदेशी सेलिब्रिटिंवर टीका केली होती.

भारताच्या प्रश्नांमध्ये त्यांनी नाक खुपसू नये असा सल्ला या दोघांनी दिला होता. त्यावरूनही या दोघांवर टीका झाली होती. कारण स्वाभाविकपणे ते शेतकरी आंदोलनाच्या विरोधात आहेत, असा निष्कर्ष काढण्यात आला. तोच मुद्दा बॅनरवरही घेण्यात आला. मात्र तेव्हा देशाचा प्रश्न होता. देशातील कायदा सुरक्षाव्यवस्था, यावर परदेशातील कुणी प्रश्नचिन्ह उपस्थित करणे हे पटणारे नव्हते. त्यामुळे या दोन महान व्यक्तिमत्त्वांनी तशी भूमिका घेतली होती.   काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांनी या कुस्तीगीरांची भेट घेतली होती. त्यामुळे काँग्रेस या प्रकरणात खेळाडूंच्या पाठीशी आहे हे स्पष्ट आहे. मग सचिनने या आंदोलकांना पाठिंबा द्यावा अशी सक्ती करण्यापेक्षा काँग्रेसने थेट या आंदोलनात उतरावे. ज्या युवक काँग्रेसच्या नेत्या रंजिता गोरे यांनी सचिनला जाब विचारला, त्यांनी एक महिला म्हणून खेळाडूंच्या सोबत आखाड्यात उतरावे. पण ते न करता सचिनने काय करावे ही उठाठेव युवक काँग्रेस करत आहे, याचे आश्चर्य वाटते.

Exit mobile version