आमदार अतुल भातखळकर यांची मागणी
‘रेनिसन्स स्टेट’ या पुस्तकात छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी करणारे बिनबुडाचे दावे केल्याबद्दल ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी देशाची माफी मागावी, तसेच महाराष्ट्र सरकारने तात्काळ या पुस्तकावर बंदी आणावी, अशी मागणी मुंबई भाजपाचे प्रभारी आमदार अतुल भातखळकर यांनी महाराष्ट्र भाजपाच्या वतीने केली आहे.
चुकीच्या आणि खोडसाळ लेखांमुळे वादग्रस्त ठरलेल्या गिरीश कुबेर यांनी त्यांच्या ‘रेनिसन्स स्टेट’ या पुस्तकात ही बदनामीची परंपरा कायम राखली आहे. स्वधर्मासाठी बलिदान देणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांबाबत अत्यंत खोडसाळ आणि द्वेषपूर्ण माहिती त्यांच्या पुस्तकात दिली आहे. या माहितीला समकालिन इतिहासातील कोणतेही पुरावे उपलब्ध नाहीत. थोरल्या छत्रपतींचा वारसा समर्थपणे पुढे नेणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांबाबत दिलेला हा बदनामीकारक मजकूर अत्यंत संतापजनक आहे, असे भातखळकर यांनी म्हटले आहे.
हे ही वाचा :
वडेट्टीवारांना ओबीसी नेता होण्याची घाई, त्यांच्या बोलण्याला काडीचीही किंमत नाही
देशात पाच हजार पेक्षा जास्त काळ्या बुरशीचे रुग्ण
तुम्ही केंद्र सरकारकडे तोंड वेंगाडण्याच्या पलिकडे काय केले?
ऑक्सीजन एक्सप्रेसने पोहोचवला १५ हजार मेट्रिक टन ऑक्सिजन
भातखळकर म्हणाले की, गिरीश कुबेर यांनी म्हटले आहे, ‘शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर वारसाचा प्रश्न सोडविण्यासाठी संभाजी महाराजांनी रक्तपात केला. त्यांनी सोयराबाई राणीसाहेब आणि अष्टप्रधान मंत्रीमंडळातील मंत्र्यांना ठार केले. या रक्तपातामुळे शिवाजी महाराजांनी घडवलेली कर्तबगार मंडळी नाहीशी झाली.’
गिरीश कुबेरांनी पुढे जाऊन असे म्हटले आहे की, ‘संभाजी महाराजांच्या सैन्याने सामान्य प्रजेवर अत्याचार केले’. या विधानास कोणताही ऐतिहासिक पुरावा नाही. संभाजी महाराजांनी सैन्याने कडक शिस्त पाळावी याकरिता पाठविलेली दोन पत्रे उपलब्ध आहेत. ही पत्रं कुबेरांचे दावे खोडून काढण्यासाठी पुरेसे आहेत.
‘संभाजी महाराजांकडे शिवाजी महाराजांप्रमाणे सहनशीलता नव्हती आणि परराष्ट्रविषयक धोरणही नव्हते’, असे अनेक खोडसाळ दावे करताना कुबेरांनी इतिहासातील अनेक महत्वाचे तपशील नजरेआड केले आहेत.
‘रेनिसन्स स्टेट’ या पुस्तकात छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी करणारे बिनबुडाचे दावे केल्याबद्दल लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी देशाची माफी मागावी, तसेच महाराष्ट्र सरकारने तात्काळ या पुस्तकावर बंदी आणावी अशी मागणी भाजपाने केली आहे. @OfficeofUT @Dev_Fadnavis @BJP4Maharashtra pic.twitter.com/STSxXSdm0b
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) May 24, 2021
खोडसाळपणाचे गाठोडे असलेल्या या पुस्तकाने महाराष्ट्राच्या श्रद्धास्थानाला अपमानित करण्याचे काम केले आहे. ठाकरे सरकारने जनभावनांची तात्काळ दखल घेऊन या पुस्तकावर बंदी घालावी. बाजारात उपलब्ध असलेल्या पुस्तकाच्या प्रती तात्काळ मागे घ्याव्यात. कुबेरांनी याप्रकरणी तात्काळ माफी न मागितल्यास त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी भातखळकर यांनी केली आहे.