राज्यसभेच्या निवडणुकीनंतर विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीला जोरदार दणका बसला आहे. महाविकास आघाडीतील सर्वच पक्षांनी विधान परिषदेला मत फुटणार नाहीत याची काळजी घेऊनही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची रणनीती यशस्वी झाली. महाविकास आघाडीची २१ मतं फुटल्याने महाविकास आघाडीत खळबळ उडाली आहे. त्यानंतर महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया देताना नाराजी व्यक्त केली आहे.
बाळासाहेब थोरात म्हणाले की, “हा पराभव धक्कादायक असून सर्वांनीच आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे. तसेच ते पुढे म्हणाले की सर्व गोष्टी आपल्या बाजूने असतानाही पराभव होत असेल तर सरकार म्हणून विचार करण्याची गरज आहे,” असे बाळासाहेब थोरात माध्यमांशी बोलताना म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
राज्यसभेप्रमाणे विधान परिषद निवडणुकीतही कुठलीही चूक होऊ नये म्हणून महाविकास आघाडीतील पक्षांनी विशेष काळजी घेतली होती. मात्र, तरीही महाविकास आघाडीची एकदोन नाही तर तब्बल २१ मतं फुटली आहेत. यात काँग्रेसची तीन मतं फुटल्याचे समोर आले आहे. कारण, काँग्रेसला ४४ पैकी ४१ मते मिळाली आहेत. दहाव्या जागेसाठी काँग्रेसचे चंद्रकांत हंडोरे आणि भाई जगताप आमने सामने होते. यात भाई जगताप यांचा विजय झाल्याने चंद्रकांत हंडोरे पराभूत झाले आहेत.
हे ही वाचा:
“महाविकास आघाडीत राहायचं का? याचा विचार करावा लागेल”
राहुल गांधींची ईडीकडून पाचव्यांदा होणार चौकशी
विधान परिषद निवडणुकीतही भाजपाने दिला महाविकास आघाडीला धोबीपछाड; पाचही उमेदवार विजयी
अनिल परबांना उद्या ईडीसमोर चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश
माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची रणनीती या साऱ्या निवडणूक प्रक्रियेत यशस्वी ठरल्याचे दिसून आले. भाजपाचे प्रवीण दरेकर, राम शिंदे, उमा खापरे, श्रीकांत भारतीय आणि प्रसाद लाड हे पाचही उमेदवार विजयी ठरले आहेत. एवढेच नव्हे तर भाजपाने ११३ मते हाताशी असतानाही तब्बल १३३ मते मिळवित महाविकास आघाडीला भगदाड पाडले.