राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि महाराष्ट्राचे महसूल मंत्री, माजी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांची दिल्लीत भेट झाली आहे. गुरुवारी संध्याकाळी बाळासाहेब थोरात हे शरद पवार यांच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचले. या दोन्ही नेत्यांच्या भेटीमुळे महाराष्ट्रातील राजकीय चर्चांना उधाण आले आहे. या दोन्ही नेत्यांनी भेटीत नेमके काय बोलले गेले यावर भाष्य केले नसले तरी सध्याची महाराष्ट्रातील परिस्तिथी बघता त्या पार्श्वभूमीवर झालेली ही भेट महत्वाची मानली जात आहे.
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ गाडी सापडली. या प्रकरणात पोलीस अधिकारी सचिन वाझे हे मुख्य आरोपी ठरले. त्यांना अटक करण्यात आली. ठाकरे सरकारने पहिल्यापासूनच वाझे यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला पण वाझे यांना राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेने अटक केल्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती बदलल्याचे दिसून येत आहे. या प्रकरणात मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह ह्यांच्यावरही बदलीची नामुष्की ओढवली.
हे ही वाचा:
वाझे प्रकरणात शिवसेना एकाकी, मित्रपक्ष झाले आक्रमक
वाझे प्रकरणात इनोव्हा, दोन मर्सिडीज नंतर प्राडोची एन्ट्री
२४ तासांत महाराष्ट्राने नोंदवले आजवरचे सर्वाधिक कोरोना रुग्ण
वाझे हे एकेकाळचे शिवसैनिक असून मुख्यमंत्री ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जातात. या विषयावरून विरोधीपक्षही पहिल्यापासूनच आक्रमक आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीसुद्धा स्वतःला या प्रकरणापासून लांब ठेवायच्या प्रयत्न करताना सातत्याने दिसत आहेत. अशातच महाराष्ट्र काँग्रेसचे जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात आणि शरद पवार यांच्यात झालेली चर्चा नेमके महाराष्ट्राच्या राजकारणाला कोणते नवे वळण देणार का? याकडे सर्वांच्या नजरा आहेत.
काँग्रेस आणि राष्ट्रवादी वाझे प्रकरणावरून आक्रमक झालेले दिसत आहेत. गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांनी तपासात बाधा येऊ नये म्हणून मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची बदली केल्याचे सांगितले आहे. तर दुसरीकडे पडलेल्या शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी या सर्व बदल्या केवळ ‘रुटीन’ बदल्या असल्याचे सांगितले होते. तर काँग्रेसचे राज्यसभेतील खासदार कुमार केतकर यांनी मनसुख हिरेन हत्येचा सखोल तपास व्हावा अशी मागणी केंद्राकडे केली आहे. वाझे प्रकरणावरून महाविकास आघाडीतली कुरबुर ही दिवसागणिक वाढताना दिसत आहे.