मिलिंद देवरांनंतर बाबा सिद्दीकी यांचा काँग्रेसला रामराम

आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस पक्षाला मुंबईत जोरदार दणका

मिलिंद देवरांनंतर बाबा सिद्दीकी यांचा काँग्रेसला रामराम

लोकसभा निवडणुकीला अवघे काही महिने असताना काँग्रेस पक्षाला मुंबईत जोरदार दणका बसला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते झियाउद्दीन उर्फ बाबा सिद्दीकी यांनी काँग्रेस पक्षाला रामराम केला आहे. मिलिंद देवरा यांनी काही दिवसांपूर्वी कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला होता. या धक्क्यातून सावरत नाही तोच बाबा सिद्दिकी यांनी काँग्रेसला धक्का दिला आहे. त्यांनी राजीनामा दिल्याची माहिती ‘एक्स’वर पोस्ट करत दिली आहे. मुंबईतील वांद्रे आणि परिसरातील अल्पसंख्यांक समुदायात सिद्दीकी यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे आगामी लोकसभा, विधानसभा आणि मुंबई महापालिका निवडणुकीत याचा परिणाम कॉंग्रेसला भोगावा लागण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

बाबा सिद्दीकी हे मुंबई काँग्रेसमधील महत्त्वाचा चेहरा होते. आगामी लोकसभा निवडणुकीआधी त्यांचा राजीनामा हा काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे. “मी तरुणपणात काँग्रेस पक्षात सामील झालो आणि हा ४८ वर्षांचा महत्त्वाचा प्रवास आहे. आज मी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा तत्काळ राजीनामा देत आहे. मला व्यक्त व्हायला खूप काही आवडले असते पण ते म्हणतात ना काही गोष्टी न सांगितलेल्या बऱ्या. या प्रवासात सहभागी झालेल्या सर्वांचे मी आभार मानतो,” असे ट्वीट त्यांनी केले आहे. बाबा सिद्दिकी हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा आहेत.

हे ही वाचा:

एनडीएचे घटकपक्ष वाढवण्यात भाजपचा पुढाकार!

अरविंद केजरीवालांना मोठा झटका, १७ फेब्रुवारीला कोर्टात हजर राहण्याचे आदेश!

दमलेल्या बाबाची बतावणी…

सायबर गुन्ह्याचा तपास करणारे अधिकारी, अंमलदार म्हणजे ‘सायबर कमांडो’

झियाउद्दीन उर्फ बाबा सिद्दीकी हे मुंबई काँग्रेसचे महत्त्वाच्या नेत्यांपैकी एक होते. १९९९, २००४ आणि २००९ मध्ये ते सलग तीन वेळा वांद्रे पश्चिम मतदारसंघातून विजयी झाले होते. त्यांनी अन्न व नागरी पुरवठा, कामगार राज्यमंत्री अशी काही खाती देखील सांभाळली आहेत. बाबा सिद्दीकी हे १९९२ आणि १९९७ च्या मुंबई महापालिका निवडणुकीत नगरसेवक म्हणून विजयी झाले होते. बाबा सिद्दीकी हे मुंबई काँग्रेस आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या समितीमध्ये महत्त्वाच्या पदावर होते.

Exit mobile version