प्रभू श्रीरामचंद्रांचे जन्मस्थळ असलेल्या आयोध्या नगरी दिवाळीच्या पूर्वसंध्येला उजळून गेली होती. शरयू नदीच्या तीरावर वसलेल्या अयोध्या नगरीत लक्षावधी दिव्यांची रोषणाई करत दीपोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी संपूर्ण अयोध्या नगरीत मिळून तब्बल बारा लाख दिवे उजळले. या रोषणाईतून अयोध्यावासीयांनी आणि उत्तर प्रदेश सरकारने विश्वविक्रम रचला आहे.
गेले काही वर्ष उत्तर प्रदेशमध्ये दिवाळीच्या पूर्वसंध्येला प्रभू श्रीरामांच्या अयोध्या नगरीत भव्य प्रमाणात दीपोत्सव साजरा केला जातो. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि सरकारमधील इतर मंत्री, केंद्रीय मंत्री अशी अनेक मान्यवर मंडळी या दीपोत्सव कार्यक्रमात सहभागी होतात. तर उत्तर प्रदेशचे नागरिकही या कार्यक्रमात मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवतात.
हे ही वाचा:
मोदी सरकारकडून देशवासियांना दिवाळीची भेट
शिवप्रतिष्ठान संघटनेने का केला समीर वानखेडेंचा सन्मान?
भाजपाशासित राज्यांनी कमी केला पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट
गुडगावमध्ये हिंदूंच्या संघर्षाला अखेर यश
यंदाच्या वर्षी अयोध्येतील दीपोत्सवाने विश्वविक्रम रचला आहे. अयोध्या नगरीत १२ लाख मातीच्या दिव्यांची रोषणाई करत हा विक्रम रचण्यात आला. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे स्वतः या कार्यक्रमात सहभागी झाले होते. तर गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचे अधिकारीही हा कार्यक्रम बघायला आले होते. या १२ लाख दिव्यांपैकी ९ लाख दिवे हे शरयू नदीच्या घाटावर लावण्यात आले. तर ५० हजार दिवे हे राम मंदिराच्या आवारात लावले गेले. तर २.५ लाख दिवे हे अयोध्या नगरीत लावण्यात आले. विश्वविक्रम रचण्यासाठी हे सर्व दिवे किमान पाच मिनिटे तेवत राहणे आवश्यक होते.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ट्विटरच्या माध्यमातून या विश्वविक्रमाची माहिती दिली. तर या कार्यक्रमाच्या आधी त्यांनी शरयू घाटावर महाआरती सुद्धा केली.