रिअल इस्टेट किंग अविनाश भोसले यांच्यावर अंमलबजावणी संचलनालय अर्थात ईडीने धाड टाकून चौकशी सुरु केली आहे. काल दिवसभराच्या चौकशीनंतर ईडीने अविनाश भोसले यांचा मुलगा अमित भोसले याला ताब्यात घेण्यात आले आहे. इतकेच नाही तर अमित भोसले यांना अधिक चौकशीसाठी पुण्यावरुन मुंबईला आणल्याचेही सांगण्यात येत आहे.
बांधकाम व्यवसायिक अविनाश भोसले यांच्या कार्यालयावर बुधवारी १० फेब्रुवारीला अंमलबजावणी संचलनालय म्हणजेच ईडीने छापेमारी केली. ईडीचे अधिकारी सकाळी ८:३० पासून एबीआयएल हाऊसमध्ये झाडाझडतीसाठी दाखल झाले. अविनाश भोसले हे मोठे बांधकाम आणि हॉटेल व्यावसायिक आहेत. परकीय चलन अर्थात फेमासंबंधीच्या प्रकरणात त्यांची ईडीकडून चौकशी होत आहे. ६ वर्षांपूर्वीच्या या विदेशी चलन प्रकरणात ही चौकशी सुरु आहे.
याप्रकरणी ईडीने काल दिवसभर चौकशी केली. त्यानंतर रात्री अमित भोसले यांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, अविनाश भोसले यांची यापूर्वीही ईडीने चौकशी केली होती. नोव्हेंबर महिन्यात तब्बल दहा तास त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली होती.फेमा कायद्यांतर्गत त्यांची चौकशी करण्यात आल्याचे वृत्त मिळत आहे. यापूर्वीही आयकर विभागाने भोसले यांच्या घरावर छापा मारला होता. भोसले यांच्या पुणे आणि मुंबईतील 23 ठिकाणांवर आयकर विभागाने धाडी मारल्या होत्या.
अविनाश भोसले यांच्यासह त्यांच्या मुलीला म्हणजेच राज्याचे कृषीराज्यमंत्री विश्वजीत कदम यांच्या पत्नी स्वप्नाली कदम यांनाही ईडीने नोटीस पाठवल्याची माहिती आहे. दोन आठवड्यापूर्वीच हे वृत्त आले होते. मात्र याबाबत विश्वजीत कदम यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.