अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्याच्या तहसीलदार ज्योती देवरे यांची एक ऑडीओ क्लिप सध्या व्हायरल झाली आहे. या ऑडिओ क्लिपमुळे सारा महाराष्ट्र हादरून गेला आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये ज्योती देवरे लोकप्रतिनिधींच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करायची इच्छा बोलून दाखवत आहेत. काही महिन्यांपूर्वीच आत्महत्या केलेल्या वनाधिकारी दिपाली चव्हाण यांना उद्देशून ज्योती देवरे यांनी एक पत्र लिहिले आहे. जे या ऑडिओ क्लिपमध्ये त्या वाचताना दिसत आहेत.
या ऑडिओ क्लिपमध्ये ज्योती देवरे या आत्महत्या केलेल्या वनाधिकारी दिपाली चव्हाण यांना उद्देशून म्हणतात, ‘दिपाली लवकरच तुझ्या वाटेवरून येणार आहे.’ पुढे जाऊन लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ आपल्याला कशा प्रकारे त्रास देतात, एक महिला म्हणून कशाप्रकारे आपल्यावर अन्याय केला जातो ही व्यथा ज्योती देवरे यांनी मांडली आहे. यावेळी त्यांनी स्थानिक लोकप्रतिनिधींच्या आणि वरिष्ठांच्या भोंगळ कारभाराचा पाढाच वाचला आहे.
हे ही वाचा:
पालिकेत शिवसेनेचे सर्वाधिक नगरसेवक; पण सर्वोत्तम फक्त तीन
म्हाडाचे रूप पालटण्यासाठी खर्च होणार बाराशे कोटी
एकट्या मोदींविरोधात विरोधकांची एकता
अमेरिकेच्या माघारीबद्दल त्या शहीद सैनिकाच्या वडिलांना दुःख
या क्लिपमध्ये ज्योती देवरे यांनी कोणत्याही लोकप्रतिनिधीचे नाव घेतले नसले तरीही त्यांचा रोख हा आमदार निलेश लंके यांच्याकडे असल्याचे म्हटले जात आहे. निलेश लंके हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आहेत. ज्योती देवरे यांच्या ऑडिओ क्लिप मध्ये त्यांनी सांगितलेल्या एका प्रसंगावरून हे लोकप्रतिनिधी म्हणजे निलेश लंके असल्याचे समजते.
काही दिवसांपूर्वी दुकानदारांचे लसीकरण केले म्हणून लोकप्रतिनिधीला राग येऊन त्यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याचा प्रकार घडल्याचे ज्योती देवरे म्हणतात यावरूनच त्यांचा रोख निलेश लंकेंकडे असल्याचे सांगितले जात आहे. कारण निलेश लंके यांनी अशाच प्रकारे एका आरोग्य कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचा आरोप काही दिवसांपूर्वी त्यांच्यावर झाला होता. पण नंतर त्या आरोग्य कर्मचाऱ्याने एक व्हिडिओ संदेश प्रसिद्ध करत आपल्याला कोणीही मारहाण करत नसल्याचे स्पष्टीकरण दिले होते.
दरम्यान ज्योती देवरे यांच्या या व्हायरल ऑडिओ क्लिपमुळे राज्यातील महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आले आहेत. तर त्यासोबतच सरकारी अधिकाऱ्यांवर लोकप्रतिनिधी आणत असलेल्या दबाव विषयीही चर्चा सुरु झाली आहे. या प्रकरणात विरोधी पक्षही आक्रमक होत सरकारला जाब विचारताना दिसत आहे