‘वसुली कांड प्रकरणातील ही तर प्याद्याची अटक’

‘वसुली कांड प्रकरणातील ही तर प्याद्याची अटक’

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना काल सोमवारी मध्यरात्री सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) अटक केली आहे. यावर भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी प्रतिक्रिया दिल्यानंतर भाजपचे नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनीही वसुली कांड प्रकरणातील ही पहिली अटक असली तरी ही प्याद्याची अटक आहे, अशी प्रतिक्रिया दिली आहे. अनिल देशमुख हे फक्त सुरूवात आहे. यामागे अजून कोण कोण आहेत याचा तपास करून त्यांना अटक करावी, अशी मागणी केली आहे.

अतुल भातखळकर यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना म्हटलंय की, अखेर देशमुख यांना अटक झाली आहे. वसूली प्रकरणात सहभागी असणारे राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अटक झाली आहे. आठवड्याभरात या प्रकरणाच्या मास्टरमाईंड्सची नावे समोर येतील अशी अपेक्षा आहे. मी सुरुवातीपासूनच सांगत आहे की, या प्रकरणातील जे मास्टरमाईंड्स आहेत ते वर्षा आणि सिल्वर ओक येथे वास्तव्यास आहेत. तपास करून सीबीआय आणि ईडी या मास्टरमाईंड्सपर्यंत नक्कीच पोहचतील.

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी तत्कालीन गृहमंत्री देशमुख यांच्यावर शंभर कोटींच्या वसुलीचे आरोप केले होते. त्यावरून केंद्रीय तपास यंत्रणांनी अनिल देशमुख यांच्या विरोधात गुन्हे नोंदवून तपास सुरू केला आहे. मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी परमबीर सिंह यांच्यावर अजूनही काहीही कारवाई केलेली नाही, असेही भातखळकर म्हणाले. या कारवाईने महाविकास आघाडी सरकारच्या पुढील अडचणी वाढल्या आहेत.

हे ही वाचा:

धनत्रयोदशी: दिवाळी खरेदीच्या उत्साहाचा दिवस!

‘१०० कोटींपैकी पवार, उद्धव यांच्या खात्यात किती गेले?’

शिवसेनेचे दिवाळी मुबारक?

UPI चा नवा विक्रम; ऑक्टोबरमध्ये ४.२२ अब्ज पेमेंट!

तब्बल १४ तास त्यांची कसून चौकशी करण्यात आली. अखेर रात्री एकच्या सुमारास त्यांना अटक करण्यात आली. देशमुख रात्रभर ईडी कार्यालयात असतील. मंगळवारी सकाळी त्यांना वैद्यकीय चाचणीसाठी रुग्णालयात नेले जाईल. यानंतर सकाळी अकराच्या सुमारास त्यांनी न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे.

Exit mobile version