“सरकार घटनाबाह्य असल्याच्या बाष्कळ बाता ठाकरेंनी बंद कराव्यात”

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर भाजपा आमदार अतुल भातखळकर यांची प्रतिक्रिया

“सरकार घटनाबाह्य असल्याच्या बाष्कळ बाता ठाकरेंनी बंद कराव्यात”

शिंदे विरुद्ध ठाकरे हे सत्ता संघर्षाचे प्रकरण गेल्या अनेक महिन्यांपासून प्रलंबित होते. अखेर सर्वोच्च न्यायालयाने यावर निकाल दिला असून आमदारांच्या अपात्रतेचे प्रकरण हे विधानसभा अध्यक्षांकडे सोपविण्यात आले आहे. त्यामुळे राज्यात भाजपा आणि शिवसेना यांचेच सरकार राहणार असल्याच्या चर्चांवर शिक्कामोर्तब झाले आहे. या निकालानंतर भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

“सर्वोच्च न्यायालयाने आज शिंदे फडणवीस सरकार हे घटनात्मक सरकार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे आता तरी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंनी हे सरकार घटनाबाह्य असून २४ तासांत पडेल, पुढील महिन्यात पडेल या बाष्कळ बाता बंद करायला हव्यात. शिंदे फडणवीस सरकार आपला उर्वरित कार्यकाळ यशस्वीपणे पूर्ण करेल आणि जनतेचा विकास अधिक गतीने करेल. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आनंद झाला आहे,” अशी आनंदी प्रतिक्रिया अतुल भातखळकर यांनी दिली आहे.

हे ही वाचा:

उद्धव ठाकरेंना पुन्हा मुख्यमंत्री करता येणार नाही, हे न्यायालयाचे मत महत्त्वाचे!

गद्दारांच्या मागणीचा मी का विचार करू म्हणून दिला राजीनामा!

‘मिशन थर्टी डेज’ साडेसात कोटीचे ड्रग्स जप्त; ३५० जणांना अटक

पंतप्रधान मोदी जूनमध्ये अमेरिकेच्या दौऱ्यावर

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर शिंदे फडणवीस सरकारला दिलासा मिळला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या दिलासादायक निर्णयानंतर अतुल भातखळकर यांनी कार्यकर्त्यांसमवेत त्यांच्या कांदीवली पूर्व भाजपा कार्यालयात जल्लोष साजरा केला.

भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनीही सर्वोच्च न्यालयाच्या निकालानंतर ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. “उद्धव ठाकरेंनी सर्वोच्च न्यायालयात सांगितलं होतं की, कावळा कोण आणि कोकीळा कोण हे निकालातून कळेल. उद्धव ठाकरे आता हे सिद्ध झालंच. कावळा कोण आणि कोकिळा कोण? कावळा काव काव करत राहिला पण कोकीळेला न्याय मिळाला! लोकशाहीचाच हा विजय! राज्यात शिंदे- फडणवीस सरकारच राहणार! अभिनंदन, अभिनंदन, अभिनंदन!!!” असे ट्विट चित्रा वाघ यांनी केले आहे. 

 

Exit mobile version