शनिवार १९ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रासहित देशभरात मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली. शिवनेरी किल्ल्यावर मोठ्या उत्साहात शिवजयंतीचा सोहळा पार पडला. अनेक वर्षांपासून मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडतो, मात्र यंदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे त्यांच्या प्रकृतीच्या कारणामुळे उपस्थित नव्हते. शिवाय त्यांनी शिवाजी महाराजांना अभिवादन करणारे ट्विट देखील दुपारी केले यामुळे नेटकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना चांगलेच ट्रोल केले आहे. उद्धव ठाकरे यांच्या अनुपस्थितीवरून भाजप नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना खोचक सल्ला दिला आहे.
शिवजयंतीच्या दिवशी शिवनेरीवर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवाद करण्याची परंपरा आहे. शिवनेरी किल्ल्यावर जाता येत नसेल तर निदान शिवाजी पार्क किंवा गेट वे समोर जाण्याचा पर्याय होता, असा खोचक सल्ला अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांना दिला आहे.
शिवजयंतीच्या दिवशी शिवनेरीवर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवाद करण्याची परंपरा आहे. अगदी शिवनेरीवर जाता येत नसेल शिवाजी पार्क किंवा गेट वे समोर जाण्याचा पर्याय होता… https://t.co/RTgyHbGEDm
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) February 19, 2022
शिवनेरीसोबतच राज्यात अनेक भागांमध्ये शिवजयंती सोहळा पार पडला. मुंबईत देखील हा सोहळा पार पडला. शिवजयंतीच्या निमित्ताने दादर येथील शिवाजी पार्कातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, खासदार अरविंद सावंत हे उपस्थित होते. मात्र, मुख्यमंत्री मुंबईतदेखील उपस्थित न राहिल्याने अतुल भातखळकर यांनी हे ट्विट केले आहे.
हे ही वाचा:
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते १०० ‘किसान ड्रोन्स’ ना हिरवा झेंडा
शिवनेरीवर बाळ शिवबासाठी पाळणा जोजवला
‘छत्रपती शिवाजी महाराजांचे ध्येय पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत’
स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना कोटी कोटी प्रणाम…..
महाराष्ट्रातील इतका महत्त्वाचा सोहळा असताना देखील मुख्यमंत्र्यांनी शिवाजी महाराजांना अभिवादन करणारी पोस्ट देखील उशिरा केल्याने साध्या समाज माध्यमांवर ते ट्रोल होत आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे प्रकृतीच्या कारणामुळे कोणत्याही कार्यक्रमांना उपस्थित राहत नाहीत.
यंदाच्या वर्षी कोरोना नियमांमध्ये शिथिलता आणल्यामुळे अनेक शिवभक्त शिवनेरी किल्ल्यावर उपस्थित आहेत. दरवर्षी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये पाळणा जोजवला जातो. आजच्या सोहळ्याला उपमुख्यमंत्री अजित पवार, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आदी नेते उपस्थित होते.