निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांना चिन्ह आणि नाव दिल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून आपल्याला सापत्न वागणूक दिली गेल्याचे म्हटले आहे. त्यावर भाजपा नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी तिखट शब्दांत टीका केली आहे.
आमदार भातखळकर यांनी टीव्ही वाहिनीला दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे की, उद्धव ठाकरे गट हा हताश झालेला आहे. त्यांनी तीन तीन वेळा कागदपत्र सादर करायला मुदतवाढ मागितली. यांनी मुदतवाढ कशाला घेतली तर खोटी प्रतिज्ञापत्रे सादर करण्यासाठी त्यांना हा वेळ हवा होता. निवडणूक आयोग हा कायद्याप्रमाणे वागत आहे, ती घटनात्मक संस्था आहे. निवडणूक आयोग चिन्ह, फाटाफूट याबाबतीत अनेक निर्णय दिले. उद्धव ठाकरे यांना मूळ शिवसेनेतून बाहेर पडावे लागले ही काय पहिली घटना नाही. १९६९, १९७८ ला काँग्रेसमध्येही फूट पडली. आणि निवडणूक आयोगाने दिलेले निर्णय सर्वोच्च न्यायालयाने ग्राह्य धरले आहेत. आता त्यांच्यापाशी माणसे नाहीत, कुटुंबातीलही कुणी नाही. त्यामुळे रडीचा डाव खेळत आहेत. स्वतःची कातडी वाचविण्यासाठी घटनात्मक संस्थांची निंदानालस्ती बदनामी करत आहेत. त्यामुळे घटनात्मक संस्थेवर अशी चिखलफेक केल्याबद्दल खरे तर केंद्रीय निवडणूक आयोगाने ठाकरे यांच्यावर बदनामीचा खटला दाखल केला पाहिजे किंवा सर्वोच्च न्यायालयाने स्वतःहून त्याची दखल घेतली पाहिजे. घटनात्मक संस्थांवर हे कसे काय आरोप करू शकतात.
ना माणसं ना कुटुंब, त्यामुळे हताश उध्दव ठाकरे रडीचा डाव खेळतायत… pic.twitter.com/q1ZsTcIe9y
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) October 13, 2022
कुठलाही पुरावा न देता हेत्वारोप करत आहेत. त्यामुळे या देशातल्या घटनात्मक संस्थआंचे अवमूल्यन करत आहेत, लोकांच्या मनात या संस्थांविषयी अनादर निर्माण करत आहेत, त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्यावर खटला दाखल केला पाहिदे असे माझे मत आहे, असेही आमदार भातखळकर म्हणाले.