राज्यात सध्या राज्यसभा निवडणुकीचे वारे वाहत असून महाराष्ट्रतील सहा जागांसाठी सात उमेदवार रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे भाजप आणि सत्ताधारी महाविकास आघाडीत चांगलीच चुरस निर्माण झाली आहे. दरम्यान, शिवसेना नेते आणि कृषीमंत्री दादा भुसे यांनी मालेगाव मध्ये एमआयएमचे आमदार मौलाना मुफ्ती मोहम्मद इस्माईल यांची भेट घेतली. या भेटीनंतर भाजपा नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी शिवसेनेवर टीका केली आहे.
दादा भुसे आणि मौलाना मुफ्ती मोहम्मद इस्माईल यांच्या भेटीचे वृत्त समोर येताच अतुल भातखळकर यांनी ‘बी टीम कोणती हे आता स्पष्ट झाले,’ असा टोला लगावला आहे. राज्यसभेत खासदार निवडून यावा यासाठी मते जोडण्याचे काम सुरू असून त्यासंदर्भात मौलाना मुफ्ती मोहम्मद इस्माईल आणि दादा भुसे यांची भेट झाल्याचे वृत्त आहे. यापूर्वी एमआयएम ही भाजपाची बी टीम असल्याचे शिवसेनेकडून सांगण्यात येत होते.
बी टीम कोणती हे स्पष्ट झाले आता… pic.twitter.com/Xi5vjThqGg
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) June 7, 2022
आपल्या पारड्यात अधिक मते पडावीत यासाठी पक्षाच्या आमदारांसह अपक्ष आणि इतर पक्षांच्या आमदारांच्या भेटी घेतल्या जात आहेत. राज्यात एमआयएमचे केवळ दोनच आमदार असून यापैकी मालेगाव मध्ये आमदार मौलाना मुफ्ती मोहमद ईस्माइल हे एक आहेत. मौलाना यांनी महाविकास आघाडीच्या पारड्यात मतदान करावे, यासाठी कृषीमंत्री दादा भुसे यांनी मौलाना मुफ्ती मोहम्मद ईस्माईल यांची भेट घेवून याबाबत चर्चा केली.
हे ही वाचा:
विधानपरिषदेसाठी भाजपाकडून ‘ही’ पाच नाव निश्चित
हिजबूल मुजाहिद्दीनच्या दहशतवाद्याला कर्नाटकातून अटक
७५ किमीचा रस्ता पाच दिवसात बांधून भारताने रचला विक्रम
नेदरलँड्सचे खासदार विल्डर्स आखाती देशांवर बरसले; ते टीकेच्याच लायक आहेत…
दरम्यान, राज्यसभा निवडणुकीत अपक्ष आणि लहान पक्षांच्या आमदारांची मतं मिळवण्यासाठी सत्ताधारी आणि भाजपामध्ये रस्सीखेच सुरु आहे. ‘राज्यसभा निवडणुकीत पाठिंबा देण्याबाबत महाविकास आघाडीने आमच्याशी संपर्क केलेला नाही. महाविकास आघाडीला पाठिंबा हवा नसल्यास आम्ही आमचा निर्णय येत्या एक- दोन दिवसांत घेऊ. पण महाविकास आघाडीने मदत मागितल्यास आम्ही त्याचा विचार करु,’ असे वक्तव्य असदुद्दीन ओवेसी यांनी केले होते.