संजय राऊत यांनी मंगळवारी १५ फेब्रुवारी रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत भाजपच्या काही नेत्यांवर आरोप केले. यावरून भाजप नेत्यांनी संजय राऊत यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. संजय राऊत यांच्यावर भाजप नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी निशाणा साधला आहे.
संजय राऊत एकदा तरी म्हणा की चौकशी करा म्हणून असा टोला अतुल भातखळकर यांनी लगावला आहे. संजय राऊत म्हणजे काय संपूर्ण महाराष्ट्र आहे का? यांच्या पक्षाला भाजपच्या युतीशिवाय १०० पेक्षा अधिक जागा मिळाल्या नाहीत. राऊत यांनी एकदाही निवडणूक लढवलेली नाही, अशी घाणाघाती टीका अतुल भातखळकर यांनी संजय राऊत यांच्यावर केली आहे. यांना मातोश्री म्हणजे महाराष्ट्र वाटायला लागला आहे, असा खोचक टोला अतुल भातखळकर यांनी लगावला आहे. संजय राऊत आणि उद्धव ठाकरे म्हणजे महाराष्ट्र नाही हे त्यांनी समजून घ्यायला हवे, असेही अतुल भातखळकर म्हणाले.
संजय राऊत यांनी काल केलेल्या आरोपांमध्ये काहीही तथ्य नाही. तुमच्याकडे माहिती आहे तर तक्रार करा ना. आम्ही कायद्याच्या चौकटीत राहून काम करतो. तुम्ही आरोपांची माहिती द्या. कालच्या पत्रकार परिषदेत त्यांनी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना २५ हजार कोटींचा घोटाळा झाला असा आरोप केला. यावर अतुल भातखळकर यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. घोटाळा झाला तर तुम्ही काय दोन वर्ष झोपला होता का? असा खोचक सवाल त्यांनी संजय राऊत यांना विचारला आहे.
हे ही वाचा:
ज्येष्ठ संगीतकार बप्पी लहिरी यांचे निधन
शिवसेना आमदार लता सोनवणे यांना जात पडताळणी समितीचा दणका
संजय राऊत यांचा ‘साडे तीन’ चा फ्लॉप शो…
मोहित कंबोज म्हणतात, म्हणून संजय राऊत यांना घाम फुटला!
रोज सकाळी यायचं, आपलं गटार उघडायचं आणि गटारगंगा वाहत ठेवायची, असा टोला अतुल भातखळकर यांनी लगावला आहे. तुमच्याकडे माहिती आहे, कागदपत्रे आहेत मग ते मुख्यमंत्र्यांना द्या ना, असे अतुल भातखळकर म्हणाले. काल पत्रकार परिषदेत संजय राऊत कसे घाम पुसत होते. ते आता घाबरले आहेत. आम्ही कसे छातीठोकपणे बोलत आहोत. कर नाही त्याला डर कशाला, अशी टीका अतुल भातखळकर यांनी केली आहे. संजय राऊत यांना त्यांचे मानसिक आरोग्य लवकर ठीक व्हावे यासाठी शुभेच्छा, असेही अतुल भातखळकर म्हणाले.