अलीकडेच पंतप्रधानांच्या ताफ्यात मर्सिडीज-मेबॅक S६५० ही नवी गाडी दाखल झाली यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामनामधून नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. त्यावर भाजप नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. जनतेचे आशीर्वाद काय असतात हे वडिलांच्या पुण्याईवर आयत्या पिठावर रेघोट्या मारणाऱ्यांना कळणार नाही, असा टोला अतुल भातखळकर यांनी लगावला आहे.
हे ही वाचा:
…म्हणून गुंड सुरेश पुजारीला हवा होता फिलिपिन्समध्ये आश्रय
… म्हणून अभिनेता विकी कौशल विरुद्ध तक्रार दाखल
सांगली जिल्हा बँकेच्या डायरीतून पडळकरांचे नाव वगळले
आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विट करत म्हटले आहे की, ‘१२ कोटींच्या त्या बुलेटप्रूफ गाडीत बसायला, पंतप्रधान निवासात मुक्काम करायला, अत्यंत सुरक्षित विमानाने फिरायला १२५ कोटी जनतेचे आशीर्वाद लागतात,’ असे म्हटले आहे. वडिलांच्या पुण्याईवर आयत्या पिठावर रेघोट्या मारणाऱ्यांना ते कधी कळणार नाही, असा खोचक टोला भातखळकरांनी लगावला आहे.
१२ कोटींच्या त्या बुलेटप्रूफ गाडीत बसायला, पंतप्रधान निवासात मुक्काम करायला, अत्यंत सुरक्षित विमानाने फिरायला १२५ कोटी जनतेचे आशीर्वाद लागतात. वडिलांच्या पुण्याईवर आयत्या पिठावर रेघोट्या मारणाऱ्यांना
ते कळणार नाही.— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) January 2, 2022
त्यानंतर अतुल भातखळकर यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. मुंबईतून १०० कोटींची वसूली करणाऱ्यांना १२ कोटींची गाडी खुपावी हे आश्चर्य नाही. देशभरात भ्रष्टाचारावर वरवंटा चालवणारा पंतप्रधान यांच्या डोळ्यात सलत आहे अशी टीका अतुल भातखळकर यांनी केली आहे. छोटे- मोठे पप्पू एकत्र येऊन कोल्हेकुई करत आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
फक्त मुंबईतून दरमहा १०० कोटींची वसूली करणाऱ्यांना १२ कोटींची बुलेटप्रूफ कार खुपावी हे आश्चर्य नाही. देशभरात वसूली, टक्केवारी आणि भ्रष्टाचारावर वरवंटा चालवणारा पंतप्रधान यांच्या डोळ्यात सलतो आहे. त्यामुळे छोटे मोठे पप्पू एकत्र येऊन कोल्हेकुई करतायत.
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) January 2, 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगातील सर्वात प्रभावशाली नेत्यांपैकी एक असून त्यांची सुरक्षा ही देखील अत्यंत महत्वाची बाब आहे. अलीकडेच पंतप्रधानांच्या अधिकृत गाडीत बदल करण्यात आला आहे. या नव्या गाडीची किंमत १२ कोटींहून अधिक आहे. त्यांच्या या अत्याधुनिक गाडीवरून अनेक नेत्यांनी टीका केली होती. प्रधानसेवक म्हणून वावरणाऱ्या मोदींनी १२ कोटींची परदेशी बनावटीची गाडी घेतली. त्यामुळे त्यांनी यापुढे स्वतःला फकीर म्हणवून घेऊ नये असे म्हणत संजय राऊत यांनी टीका केली आहे. त्यावर अतुल भातखळकर यांनी संजय राऊत यांच्यावर टीकास्त्र सोडले.