२०१४ नंतर लिंचिंग; मग १९८४ मध्ये काय आंधळी कोशिंबीर होती का?

२०१४ नंतर लिंचिंग; मग १९८४ मध्ये काय आंधळी कोशिंबीर होती का?

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लिंचिंगच्या घटनेवरून मोदी सरकारवर टीका केली होती. त्यावरून भाजप नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी राहुल गांधी यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. २०१४ पूर्वी लिंचिंग हा शब्द ऐकायला मिळाला नव्हता, असे राहुल गांधी यांनी म्हटले होते. त्यावर १९८४ मध्ये काय आंधळी कोशिंबीर होती का? असा खोचक सवाल अतुल भातखळकर यांनी विचारला आहे.

१९८४ साली इंदिरा गांधींच्या दुर्दैवी हत्येनंतर सुमारे ५ हजार शीख बंधूंची कत्तल झालेली. स्वतः इंदिरा गांधी या पंतप्रधान असताना दिल्लीमध्ये आंदोलन करणाऱ्या साधूंवर गोळीबार झाला होता. या घटना म्हणजे आंधळी कोशिंबीर होत्या का? असा प्रश्न अतुल भातखळकर यांनी राहुल गांधींना विचारला आहे.

पंजाबमध्ये शीख समुदायाकडून झालेल्या वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन जणांच्या मृत्युवरून राजकीय वातावरण तापले होते. रविवारी पंजाबमधील कपूरथला येथील निजामपूर गावात एका गुरुद्वारामध्ये शीख धर्माच्या ‘निशान साहिब’चा अनादर केल्याबद्दल जमावाने अज्ञात व्यक्तीची हत्या केली होती. त्यापूर्वी शनिवारी, अमृतसरमधील सुवर्ण मंदिरात कथित विटंबनेप्रकरणी जमावाने आणखी एका व्यक्तीला बेदम मारहाण केली होती. राहुल गांधी यांच्या या वक्तव्यावर भाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनीही पलटवार करत राहुल गांधींचे वडील राजीव गांधी यांना लिंचिंगचे जनक म्हटले आहे.

Exit mobile version