राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि महाराष्ट्राचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांची ईडी चौकशी सुरू आहे. सकाळी ७.४५ वाजल्यापासून नवाब मलिक यांच्या चौकशीला सुरुवात झाली असून मुंबई येथील ईडी कार्यालयात त्यांना आणण्यात आले आहे. दरम्यान भाजप नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी ‘टीव्ही ९’शी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे.
“हा संपूर्ण तपास हा कायद्याच्या कक्षेत राहून होत असतो. त्यामुळे नवाब मलिक यांना ईडीने त्यांच्या कार्यालयात आणले आहे तर नवाब मलिकांनी त्याची उत्तरे द्यावीत. इक्बाल कासकरपासून ते दाऊदच्या संबंधित अनेक लोकांनी त्यांचे आणि नवाब मलिकांचे व्यावसायिक संबंध असल्याचे सांगितले आहे,” असे अतुल भातखळकर म्हणाले. “नवाब मलिक हे त्यांचे फ्रंट मॅन असल्याचे देखील अनेकांनी सांगितल्याचे अतुल भातखळकर म्हणाले. ही स्वतःकडची माहिती असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता नवाब मलिकांनी त्याची उत्तरे द्यावीत. ईडी कायद्याच्या चौकटीत राहून कारवाई करेल आणि त्यांना ते मान्य नसल्यास न्यायालय आहे,” असे अतुल भातखळकर म्हणाले.
माफिया दाऊदशी संबंधित व्यक्ती मोदीराज्यात सुटेल कसा? pic.twitter.com/6TURMB3guS
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) February 23, 2022
“नवाब मलिकांनी दाऊदच्या संबंधी लोकांसोबत काही आर्थिक व्यवहार केल्याचा एक पुरावा देवेंद्र फडणवीस यांनी दोन महिन्यांपूर्वी पत्रकार परिषदेत दिला होता. त्याचे कुठ्लेही स्पष्टीकरण नवाब मलिक देऊ शकलेले नाहीत. तसेच ज्यांना वाटत आहे की हे सुडाच राजकारण आहे त्यांनी न्यायालयात जावे, असेही अतुल भातखळकर म्हणाले. चौकशीला का घाबरत आहात? आम्ही घबरत आहोत का? मी किंवा किरीट सोमय्या म्हणतोय का माझी चौकशी करू नका? फडणवीस सरकारच्या काळात २५ हजार कोटींचा घोटाळा झाल्याचे बोलतात मग करा ना चौकशी,” असेही अतुल भातखळकर म्हणाले. संजय राउत यांच्या पत्रकार परिषदेला सात दिवस झाले पण त्यांनी केलेल्या आरोपांच काय झालं पुढे? कोणाची नावं उघड करणार होते? घोटाळे बाहेर काढणार होते? असे सवाल अतुल भातखळकर यांनी विचारले आहेत. भंगारवाल्याचा करेक्ट कार्यक्रम झाला असे ट्विट करत अतुल भातखळकर यांनी नवाब मलिक यांना टोला लगावला आहे.
भंगारवाल्याचा करेक्ट कार्यक्रम झाला…
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) February 23, 2022
बुधवार, २३ फेब्रुवारी रोजी पहाटे ४.३० वाजता सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीचे अधिकारी नवाब मलिक यांच्या मुंबई येथील निवास्थानी दाखल झाले. त्यानंतर नवाब मलिक यांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांना ईडीच्या कार्यालयात आणण्यात आले आहे. गेल्या तब्बल दोन तासांपासून मलिक यांची ईडी कार्यालयात चौकशी सुरू आहे.
हे ही वाचा:
नवाब मलिक यांची ईडी चौकशी सुरु! आज अटक होणार?
‘दिशा सालियानच्या मृत्यूचे सत्य ७ मार्चनंतर बाहेर येईल’
हर्षच्या हत्येनंतर विहिंप आणि बजरंग दल राज्यव्यापी आंदोलन करणार
मुख्यमंत्री महोदय, कळकळीची विनंती!!! यावेळी तरी मनाचा कोतेपणा दाखवू नका…
कुर्ल्यातील एक मोक्याची जमीन तुटपुंज्या किंमतीत विकत घेतल्याचा आरोप विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मलिकांवर केला होता. मुंबई बॉम्बस्फोटातील गुन्हेगारांकडून मलिक यांच्याशी संबंधित कंपनीने ही जागा विकत घेतल्याचे फडणवीस यांनी म्हटले होते. त्या संदर्भात पुरावे दिले होते. याच व्यवहारासंदर्भात नवाब मलिक यांची चौकशी सध्या सुरू असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.