‘करदात्यांच्या पैशाच्या कुरणात तिन्ही पक्ष चरतात’

‘करदात्यांच्या पैशाच्या कुरणात तिन्ही पक्ष चरतात’

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या चुलत भावाच्या सह-मालकीच्या कंपनीची ईडीकडून १०.९ कोटी रुपयांच्या कथित पेमेंटची चौकशी सुरू आहे. अनेक कंपन्यांच्या माध्यमातून हे पैसे अनिल देखमुखांना पाठवण्यात आले होते, असा ईडीला संशय आहे. या संदर्भात Innovave Engineering and Advisors Pvt Ltd या कंपनीची चौकशी सुरू असून ही कंपनी अनिल देशमुख यांचे नातेवाईक सत्यजीत देशमुख यांच्या मालकीची आहे.

यावरून भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केंद्रीय दक्षता आयोगाकडे पत्र लिहून लेखी तक्रार केली आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नातेवाईकांच्या कंपनीला शून्य अनुभव असताना कोस्टल रोड आणि सी लिंक प्रकल्पात सल्लागार म्हणून नेमणूक करण्यात आली आहे, अशी टीका अतुल भातखळकर यांनी केली आहे. दोन वर्षात ठाकरे सरकारने सुमारे २० कोटींचा रतीब घातल्याची घाणाघाती टीका त्यांनी केली आहे. ठाकरे सरकारने करदात्यांच्या पैशाचे कुरण बनवले आहे आणि तिन्ही पक्ष रात्रंदिवस चरण्याचे काम करत आहेत, असा टोला अतुल भातखळकर यांनी लगावला आहे.

सत्यजीत देशमुख हे अमेरिकास्थित लुईस बर्जरचे उप-कंत्राटदार आहेत. तसेच ते वर्सोवा-वांद्रे सी लिंक प्रकल्पासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार असून मुंबई कोस्टल रोड आणि मुंबई-नागपूर एक्स्प्रेस वे या दोन इतर हाय-प्रोफाइल प्रकल्पांसाठी देखील ते उप-सल्लागार आहेत. सत्यजीत देशमुख यांनी ईडीकडे सादर केलेल्या निवेदनानुसार, इनोवेव्हने यापूर्वी कोणताही सल्लागार प्रकल्प केलेला नाही. तसेच सप्टेंबर ते ऑक्टोबर २०२१ दरम्यान तीन प्रसंगी, सत्यजीत यांना देशमुखांना त्यांच्या अधिकृत निवासस्थानी अधिकृत बैठकांमध्ये उपस्थितीबद्दल प्रश्न एजन्सीने विचारले होते.

Exit mobile version